पिंपरी – सर्व्हर बंद पडल्याने शिधापत्रिकांचे ऑनलाइन कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प पडले आहे. पिंपरी आणि चिंचवड विभागातील सुमारे 600 ते 650 शिधापत्रिकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.
निगडी परिमंडळ कार्यालय अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील शिधापत्रिकांचे कामकाज चालते. त्यामध्ये प्रामुख्याने शिधापत्रिकांमध्ये नाव वाढविणे, नाव कमी करणे, दुबार शिधापत्रिका काढणे, पत्ता बदलणे, नवीन शिधापत्रिका काढणे, विभक्त शिधापत्रिका काढणे आदी कामकाज केले जाते.
18 तारखेपासून हे काम सुरू असलेल्या संकेतस्थळाचा सर्व्हर बंद पडला आहे. त्यामुळे त्यावर चालणारे सर्व कामकाज थंडावले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हरच बंद पडल्याने ऑनलाइन शिधापत्रिकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. आणखी चार दिवस हे काम बंद राहणार असल्याने त्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे म्हणाले, ऑनलाइन शिधापत्रिकांचे कामकाज चालणाऱ्या यंत्रणेचा सर्व्हर 18 तारखेपासून बंद आहे. त्यामुळे त्यावर चालणारे कामकाज थांबले आहे. ही यंत्रणा पुर्ववत सुरू होण्यासाठी आणखी चार दिवस लागणार आहे. पिंपरी आणि चिंचवड विभागाच्या 600 ते 650 शिधापत्रिकांच्या ऑनलाइन कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.