शेतजमिनींची अवस्था वाळवंटासारखी

इंदापूर तालुक्‍यातील स्थिती; दुष्काळाच्या झळा तीव्र

बावडा- इंदापूर तालुक्‍याला दुष्काळ नवा नाही परंतु चालू वर्षी दुष्काळी झळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्या आहेत. पाण्याअभावी अनेक शेतजमिनींची अवस्था वाळवंटासारखी झाली आहे. शेतकरी व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच व्यवसायांबरोबर बाजारपेठा ग्राहकांअभावी ओस पडल्याने आर्थिक संकट ही घोंघावत आहे.

इंदापूर तालुक्‍यात वाढलेल्या दुष्काळी स्थितीमुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी धास्तावला आहे. पाण्याभावी फळबागा जळू लागल्या असून बागा जगविताना शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. फळ बागांना केलेला खर्च जादा व उत्पन्न मात्र कमी मिळत असल्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

दुष्काळाच्या तीव्रतेत बावडा, लाखेवाडी, रेडणी, वडापुरी, अवसरी, बेडशींग, काटी, रेडा, त्याचबरोबर नीरा नदीच्या परिसरात बऱ्याच ठिकाणच्या विहीरीचे व कुपनलिकांचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याअभावी फळ बागा जळू लागल्या आहेत. शेतात डाळींब बागेचा फक्त सांगाडाच दिसू लागले आहे तर हाता तोंडाला आलेले आंबा, केळी, पपई, पेरू आदी फळबागा उन्हाने करपून गेल्या आहेत.
इंदापूर तालुक्‍यात डाळींब व पेरू उत्पादक शेतकऱ्यांची बागा जगवण्यासाठी धडपड सुरु असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. एकतर फळांची शेती बाजारभावामुळे अडचणीत आली असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातून दुष्काळाचा फटका बागांना बसत असल्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही शेती करणे अवघड झाल्याची प्रतिक्रिया तालुका व परिसरातील फळबागा शेतकऱ्यांतून उमटत आहे.

  • निवडणुकीत बोलणारे पुढारी गप्प…
    लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या आधी सर्वच पुढाऱ्यांनी मोठमोठ्या गप्पाही ठोकल्या. मात्र, निवडणुकीनंतर मात्र सगळेच पुढारी व नेते मंडळी हाताची घडी आणि तोंडावर बोट याप्रमाणे गप्प झाले आहेत. दुष्काळ निवारणासाठी कोणीच पुढे यायला सोडाच परंतु, कोणी बोलायला तयार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.