पाचगणी, (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा मतदारसंघातील पाचगणी शहरातील ९ बुथवर १०,०२० मतदारांपैकी ४,८८६ इतक्या मतदारांनी आपला हक्क बजावत ४८.७६ टक्के मतदान केले.
सातारामतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात खरी लढत झाली.शशिकांत शिंदे यांनी पूर्वीच्या जावळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे जावळी- महाबळेश्वरमध्ये चुरशीने मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
पाचगणी शहरातील ९ बुथवर ७२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक केंद्राबाहेर दोन टेबल लावण्यात आले होते. अनेक कार्यकर्ते आपल्या मतदारांना घरून बूथपर्यंत आणताना दिसत होते. यादरम्यान कसलाही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बांबू पर्यावरणपूरक मतदान केंद्र
पाचगणीतील श्री घाटजाई विद्यामंदिरातील मतदान केंद्राला बांबू पर्यावरण पूरक मतदान केंद्र असे नाव दिले होते. तर या केंद्राच्या प्रवेशद्वारावर बांबूच्या झाडांची लागवड केलेल्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. यामधून आम्ही पर्यावरणपूरक वस्तू आणि झाडे लावावीत असे या देखाव्यातून संदेश देत असल्याचे केंद्रप्रमुख देवराई आर्ट व्हिलेजच्या संचालिका मंदाकिनी माथूर यांनी सांगितले.