पुणे – नातेवाईकांच्या शेतीसाठी पुण्याच्या पाण्यावर डोळा

पाणी कपातीवरून मंत्र्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न

पुणे – जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांच्या तसेच त्यांच्या आप्तस्वकियांच्या फुरसुंगी परिसरात असलेल्या शेत जमिनीला धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी दबाव वाढविण्यात येत आहे. त्यासाठी पुण्याचे पाणी कमी करून फुरसुंगी गावच्या पाण्याच्या टंचाईच्या नावाखाली कालव्यातून पाणी देण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडून केली जात असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी एका अधिकाऱ्याकडून थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समोरच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पाणी सोडण्याचा आग्रह असल्याचे सांगत, कपातीचा विचार करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री बापट यांनी शुक्रवारी दुपारी अचानक महापालिकेत पालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीस आमदारांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी, महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पाण्याचा आढावा घेतल्यानंतर कालव्यातून फुरसुंगीच्या पाणी पुरवठ्यासाठी काही दिवस पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात येत असून या गावाची स्थिती गंभीर आहे. याबाबत निर्णय घ्यावा तसेच किमान 30 एमएलडी पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यावर महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पालकमंत्री बापट यांनी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली कालव्यातून पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणात गळती, पाण्याची चोरी तसेच अपव्ययं होतो, असे सांगितले. तर फुरसुंगीला पाण्यासाठी सध्या 40 टॅकर दिले जात असून ते दुप्पट करता येतील मात्र, कालव्यात पाणी सोडता येणार नाही असे स्पष्ट केले. त्यावेळी या अधिकाऱ्याने पालकमंत्र्यांनाच प्रतीप्रश्‍न करून या गावाला पाणी दिले जाणार नसेल तर, मी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आम्ही काय उत्तर द्यायचे असा प्रतीप्रश्‍न केला. यावेळी संतापलेल्या बापट यांनी आम्ही पाणी देणारच अशी भूमिका कधी घेतली असा थेट प्रश्‍नच या अधिकाऱ्याला विचारला, तसेच सर्वांना पाणी मिळावे अशी आमची भूमिका असून पुण्यालाही पाणी पुरले पाहिजे एवढीच माझी भूमिका आहे. त्यामुळे पाण्यावरून माझ्यात आणि शिवतारेंमध्येच काहीच विसंगती नसल्याचेही त्यांनी या अधिकाऱ्याला सुनावले. त्यामुळे या अधिकाऱ्याची बैठकीत चांगलीच कोंडी झाल्याचे बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शेतीसाठी अट्टाहास
जलसंपदा विभागातील काही बड्या हस्तींची फुरसुंगी परिसरात शेती असून तिला पाणीपुरवठा करण्यासाठी या अधिकाऱ्यांकडून किमान 30 एमएलडीने तरी पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. फुरसुंगी हा परिसर शिवतारे यांच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांच्यावरही या अधिकाऱ्यांकडून दबावतंत्र वापरण्यात येत असून त्याद्वारे पुणे शहराला वेठीस धरण्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे वारंवार या दोन्ही नेत्यांची नावाने वाद निर्माण करून शहराचे पाणी कमी करून या शेतीसाठी वळविण्याचा प्रकार सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.