द्रुतगतीवर प्रवाशांना लुटणारे दोघे जेरबंद

तळेगाव दाभाडे – लिफ्टच्या बहाण्याने मोटारीत बसलेल्या प्रवाशांना चाकुचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघा जणांच्या टोळीचा तळेगाव पोलिसांनी पर्दापाश केला आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले असून, अन्य दोघांना शोध सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पप्पु शिवाजी कांबळे आणि सनी गौतम घाडगे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी प्रताप खिमजी भानुशाली (वय 53, रा. निखळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रताप भानुशाली आणि त्यांचा भाऊ वालजी खिमाजी भानुशाली हे दोघे 26 एप्रिल रोजी मुंबईला निघाले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास हिंजवडी येथील मुंबई बेंग्लोर महामार्गावर भुजबळ चौक येथे मुंबईला जाण्यासाठी थांबले होते. बसची वाट पाहत असताना एका पांढऱ्या रंगाची मोटार त्यांच्याजवळ आली. चालकाने कुठे जायचय अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने मुंबई सांगितले. आम्हीही मुंबईला निघालो आहोत, चला तुम्हाला अंधरीपर्यंत सोडतो, असे म्हणत चालक प्रत्येकी 300 रुपये भाडे पडेल, असे सांगून मोकाळा झाला. ठरलेले भाडे दिल्यानंतर भानुशाली बंधू मोटारीत बसले. त्यावेळी मोटारीत मागील सीटवर दोघे असे तिघे होते.

फिर्यादी यांनी हातातील बॅग डिकीत ठेवली आणि मोटारीत बसले. बसल्यानंतर मोटार पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने निघाली. काही अंतर गेल्यानंतर लोढा स्कीमच्या पुढे आल्यानंतर चालकाने मोटार सर्व्हिस रस्त्यावर घेतली. त्यानंतर लागलीच भानुशाली बंधूंना मोटारीतील दोघांनी चाकुचा धाक दाखविला. त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्‍कम आणि बॅगमधील 20 हजार रुपये घेतले आणि दोघांनाही मोटारीतून ढकलून दिले. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा मागावर होते. गुन्ह्याच्या तांत्रिक बाजू तपासत खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अटक केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.