Hemant Godse Meet Chhagan Bhujbal | महायुतीत मागील काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून वाद सुरू होता. अखेर नाशिकची जागा शिंदे गटाला मिळवण्यात मोठे यश मिळाले आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेसाठी महायुतीतील अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे देखील इच्छुक होते. मात्र, भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर आज हेमंत गोडसेंनी भुजबळ यांची भेट घेतली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच हेमंत गोडसे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या फार्मवर त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. हेमंत गोडसे आणि भुजबळांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. यादरम्यान, छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
“हेमंत गोडसेंना आज भेटलो. ते अर्ज दाखल करताना देखील मी त्यांच्यासोबत होतो. कामाला सुरुवात झालेली आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सर्व गोडसे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहोत. ते बोलावतील तेव्हा किंवा आयोजित केलेल्या सभेला देखील मी हजर राहणार आहे. राष्ट्रवादी १०० टक्के हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नाशिकमधील दोन्ही जागा निवडून आणू,” असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. Hemant Godse Meet Chhagan Bhujbal |
हेही वाचा: