दुष्काळाच्या मुद्द्यावर झेडपी सदस्य एकवटले

पुरेसे पाणी मिळत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर : काळचौंडीमध्ये टॅंकरचालकावर गुन्हा

दीपक पवारांचा मानकुमरेंना टोला

दरम्यान, दुष्काळ निवारणासाठी जिल्हा परिषद व सदस्यांनी मदत करण्याच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. त्यावेळी, बापू तुमच्या सरकारची मदत करण्याची परिस्थिती नाही का, असा सवाल उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी भाजप सदस्य दीपक पवार यांना विचारला. त्यावर पवार म्हणाले, भाऊ तुमची परिस्थिती आहे, म्हणूनच तुम्हाला उपाध्यक्ष केले आहे, असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

सातारा – जिल्ह्यातील दुष्काळाच्या भीषण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य एकवटले. दुष्काळात जनावरांसाठी चारा, पाण्याच्या टाक्‍यांसह, एका महिन्याचे मानधन देण्याची तयारी सदस्यांनी दर्शविली. तर माणसांसह जनावरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचा मुद्दा अरूण गोरे यांनी लावून धरला. दरम्यान, पाणी पुरवठा टॅंकरवर करडी नजर ठेवल्यामुळे काळचौंडी येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगौड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, कृषी सभापती मनोज पवार, अति.मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सत्यजीत बडे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

दरम्यान, सभेच्या सुरूवातीला मागील सभेचा कार्यवृत्तांत मंजूर केल्यानंतर ऐनवेळचे विषय चर्चेला घेण्यात आले. मात्र, अरूण गोरे व मानसिंगराव जगदाळे यांनी जिल्ह्यातील दुष्काळावर चर्चा करण्याची मागणी केली. गोरे यांनी माणसांना आणि जनावरांना पुरेसे पाणी मिळत नसून पुरवठा वाढविण्याची मागणी केली. त्याचबरोबर टॅंकरचालकांच्या भोंगळ कराभारामुळे लोकांना पाणी मिळत नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ठरवून दिलेल्या खेपा होत नाहीत. जनावरांचे लसीकरण अद्याप झाले नाही आणि दुष्काळात माण तालुक्‍यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता आहे, असे मुद्दे उपस्थित करत माण तालुक्‍यात यंदा सर्वात दुष्काळ पडला आहे.

त्यामुळे सेस फंडातून निधी उपलब्ध केला जावा, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्ष संजीवराजेंनी सेस फंडातून मदत करता येणे कायदेशीर दृष्ट्या शक्‍य नाही. परंतु सर्व सदस्यांनी एकत्रित निधी गोळा करून पाण्याच्या टाक्‍या वितरित करण्यात येतील, असे सांगितले. तर निवास थोरात व इतर सदस्यांनी चाऱ्याच्या गाड्या देण्याचे आश्‍वासन दिले. दिपक पवार यांनी एक महिन्याचे मानधन देण्याची तयारी दर्शविली.

दरम्यान, मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी माण तालुक्‍यात पशुवैद्यकीय अधिकारी वाढविण्याचे आश्‍वासित केले. त्याचबरोबर नेमून दिलेल्या ठिकाणी पाणी वितरित न करता इतरत्र पाणी वितरित करणाऱ्या टॅंकरचालकावर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. तसेच सध्या धोम धरणात 0.59, कण्हेर धरणात 1.81, कोयना धरणात 12.49, धोम-बलकवडी धरणात 0.30, उरमोडी धरणात 1.05, तारळी धरणात 1.95 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून तो पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. प्रदिप विधाते यांनी जिल्हा बॅकेच्यावतीने सुरू करण्यात आलेले टॅंकर शासकीय फिलींग पॉंइटवरून भरून देण्यात यावेत, अशी मागणी केली. त्यावर संजीवराजे यांनी शक्‍य तिथे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

दरम्यान, दुष्काळी गावांमध्ये ग्रामसेवक राहत नसल्याचा मुद्दा दिपक पवार यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. मानसिंगराव जगदाळे यांनी जिल्ह्यातील धरणांमधील सांगली जिल्ह्याला देता कामा नये, अशी मागणी केली. तर निवास थोरात यांनी टेंभू योजनेतून सांगली आणि सातारा जिल्ह्याला नेमके किती पाणी मिळते, याची पाहणी सातारा व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या करावी, अशी मागणी केली.

धैर्यशील अनपट यांना चारा छावण्यांमधील जनावरांचे अनुदान वाढविण्यात यावी तसेच एका व्यक्तीची केवळ पाचच जनावरे छावणीमध्ये दाखल करून घेत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सज्ञान व्यक्तीच्या नावावर प्रत्येकी पाच जनावरे दाखल करता येतात. एका कुटुंबात एका पेक्षा अधिक सज्ञान व्यक्ती असल्यामुळे इतर व्यक्तींच्या नावावर उर्वरित जनावरे दाखल करता येतील, असे सांगितले. तर प्रति जनावरांचा अनुदानाचा मुद्दा धोरणात्मक असून त्यावर राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याचे संजीवराजे यांनी सांगितले.

स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे सभागृहात तैलचित्र

माजी खासदार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करत मंगेश धुमाळ यांनी पाटील यांचे तैलचित्र सभागृहात लावण्याची मागणी केली. धुमाळ यांची मागणी एकमताने मंजूर करण्यात आली. मात्र, धुमाळ यांच्या पाठोपाठ डॉ.भारती पोळ यांनी माजी आमदार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्या कार्याचा उल्लेख करत तैलचित्र लावण्याची मागणी केली. पोळ यांची मागणी देखील सभागृहाने एकमताने मंजूर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)