मेडिकल कॉलेजच्या कामाला मिळणार का गती?

पदनिर्मिती अन्‌ भूमिपूजनाचे लागले वेध
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता

सम्राट गायकवाड

सातारा – बहुचर्चित आणि जिल्ह्याची गरज असलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामाला आता गती मिळण्याची आवश्‍यकता आहे. कॉलेजसाठी आवश्‍यक 25 एकर जागा वैद्यकीय शिक्षण खात्याला प्राप्त झाली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार स्थानिक प्रशासनाकडून पदनिर्मितीचा प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पदानिर्मितीला मंजुरी देऊन मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करावे, अशी मागणी जनतेतून होत असून त्यासाठी विशेषत: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता आहे.

आघाडी सरकारच्या काळात राज्यात पाच ठिकाणी मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये साताऱ्याचा समावेश होता. साताऱ्यातील मेडिकल कॉलेजसाठी सातारा-कोरेगाव रस्त्यावर खावली गावातील शासनाची जागा मंजूर करण्यात आली होती. परंतु आ. शशिकांत शिंदे यांनी शहरापासून खावली गाव दूर असल्याचे सांगत पर्यायी शहरानजिक कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात अखेरपर्यंत मेडिकल कॉलेजच्या बाबतीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही.

अखेर दिड वर्षापूर्वी खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्याचे जाहीर आश्‍वासन दिले. त्यानंतर हालचाली गतीमान झाल्या. कृष्णा खोरे विकास महामंडळाची 25 एकर जमिन वैद्यकीय शिक्षण खात्याला विनाशुल्क हस्तांतरित करण्यात आली. त्यामध्ये जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचा एकत्रित कार्यभार असलेले ना. गिरीश महाजन यांनी मोलाची भूमिका बजावली.

त्यानंतर मात्र, सरकार आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून कोणतीही हालचाल झाली नाही. अखेर पुन्हा एकदा सहा महिन्यापूर्वी साताऱ्यात सिंचन प्रकल्प व रस्ते भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी, ना. गिरीष महाजन आणि खा. उदयनराजे एकत्रित आले. त्यावेळी खा. उदयनराजेंनी पुन्हा एकदा मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्याची मागणी केली. त्यावर एका महिन्याच्या आत पदानिर्मितीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी ना. गिरीश महाजन यांना केली.

त्यानंतर सातारा मेडिकल कॉलेजसाठी समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या सांगली-मिरज मेडीकल कॉलेजच्या प्रशासनाने पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करून मंत्रालयात सादर केला. मात्र, दरम्यानच्या कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे सरकारकडून पदनिर्मितीला मंजुरी मिळू शकली नाही. परंतु आता आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तात्काळ पदानिर्मितीला मंजुरी द्यावी आणि त्याचबरोबर भूमिपुजनाची तारीख निश्‍चित करावी, अशी येथील जनतेची आग्रही मागणी आहे.

मेडिकल कॉलेजच्या कामाबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.30 मे रोजी भाजपचे शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यावेळी मेडीकल कॉलेजसह जिहे कठापूर आदी प्रश्‍नांवर चर्चा करण्यात येणार आहे. कॉलेजच्या पदार्निमिती प्रस्तावाला तात्काळ मंजूरी मिळावी आणि त्याचबरोबर भूमिपुजनाची तारीख निश्‍चित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात येईल असे पावस्कर यांनी सांगितले.

विक्रम पावसकर, सातारा जिल्हाध्यक्ष, भाजप.

Leave A Reply

Your email address will not be published.