घनकचरा व्यवस्थापन “मॉडेल सिटी’साठी कराडची निवड

पालिकेला वसुंधरा पुरस्काराचे नामांकन जाहीर 
कराड – कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात मिळवलेल्या अव्वल स्थानामुळे कराडकरांची मान उंचावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 चा निकाल व शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने कराड शहराची घनकचरा व्यवस्थापन “मॉडेल सिटी’म्हणून निवड केली असल्याची माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, गटनेते सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते.

मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची अंमलबजावणी राज्यातील यंत्रणांकडून विहित कालमर्यादेत न झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली असून घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीमध्ये प्रगती होण्यासाठी राज्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या तीन व एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तीन अशा एकूण सहा शहरांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये कराड शहराचा समावेश करण्यात आला आहे. सदर सहा मॉडेल शहरांमध्ये घनकचरा नियम 2016 ची संपूर्ण पूर्तता एप्रिल पासून ऑक्‍टोबर या सहा महिन्याचे कालावधीत करण्याचे आदेश आहेत. यादृष्टीने कराड पालिकेने घनकचरा प्रक्रिया सुविधा केंद्रासाठी योग्य जागेची निवड करणे, स्वच्छता भूभरावासाठी योग्य जागेची निवड करुन त्याठिकाणी स्वच्छता भूभरावाचा वापर सुरु करणे, जैविक विघटनशील, पुर्नप्रक्रियायोग्य, ज्वलनशील, सॅनिटरी कचरा, घरगुती घातक कचरा यासारख्या कचरा निर्मिती करणाऱ्यांना जागीच कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास भाग पाडणे, घरोघरी जावून कचरा संकलित करणे, त्याचे वर्गीकरण व प्रक्रिया केंद्रापर्यत कचऱ्याची बंदिस्त वाहनातून वाहतूक करणे, बांधकाम करताना व जुने बांधकाम पाडताना होणाऱ्या कचऱ्याची स्वतंत्र साठवणूक व वाहतूक होत असल्याची खात्री करणे, जुन्या कचऱ्यावर बायोमिनींग, कॅपींग ची प्रक्रिया पुर्ण करणे या गोष्टींवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचा जुलै मध्ये प्रगतीचा तिमाही अहवाल तर पुढील तिमाहीचा अहवाल ऑक्‍टोंबर मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर सादर करायचा आहे. त्यादृष्टीने पालिकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी शहराच्या विकासासाठी सहकार्याचा हात द्यावा, असेही आवाहन उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केले.

कराड नगरपालिकेची स्वच्छ सर्वेक्षणातील देशपातळीवरील भरारी कराडकरांसाठी अभिमानास्पद अशीच आहे. नागरिकांच्या उत्तम सहकार्यामुळे हे शक्‍य होत आहे. पालिकेच्या कामकाजाची दखल घेत वसुंधरा पुरस्कारासाठीचे नामांकन जाहीर झाले आहे. यांच्या निकषामध्ये सुध्दा कराड नगरपालिका उत्तीर्ण होईल.

यशवंत डांगे, मुख्याधिकारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)