नगरकरांच्या सामूहिक योगाची विश्‍वविक्रमी नोंद

संयोजन समितीने जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते स्वीकारले प्रमाणपत्र

नगर – योग दिनात नगरकरांनी सहभागी होवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जिल्हा क्रीडा संकुलातील मुख्य कार्यक्रमाबरोबरच तालुकास्तरावरील योगदिन आणि प्रत्येक शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमात 15 लाखांहून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. जिल्ह्याच्या या विश्‍वविक्रमाची नोंद “वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ने घेतली असून तसे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा कार्यालयास दिले आहे.

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्यावतीने जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभरामध्ये सुमारे 15 लाख 23 हजार 642 नगरकरांनी योगसाधना करून जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला. या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये जागतिक विश्वविक्रम म्हणून नोंद झाली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रमुख पवन सोलंकी यांनी तसेच प्रमाणपत्र समितीस पाठवले.

संयोजन समितीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे हे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी संयोजन समितीतील जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ, अमोल बागुल, प्रेरणा नाबरिया, सुधा कांकरिया, भरत बागरेचा, राहुल पाटोळे, श्रीनिवास नाबरिया, मनिषा गुगळे, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे व क्रीडा अधिकारी दीपाली बोडके, सुवालाल शिंगवी, प्रणिता तरोटे, कांचन कांकरिया आदी उपस्थित होते.

नगरच्या योग दिनाच्या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली, ही नगर जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात’ साठी हा उपक्रम जरूर पाठवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जिल्हाभरामध्ये विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एन.एस.एस., एन.सी.सी., स्काऊट गाईड, तांत्रिक शैक्षणिक संस्था, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक त्यांच्या आस्थापनांमध्ये तसेच तालुका क्रिडा संकुलांमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगसाधना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.