बुडते जहाज वाचवण्याऐवजी कॅप्टननेच त्यातून उडी घेतली 

शिवराजसिंह चौहान: कॉंग्रेस आणि राहुल यांच्यावर निशाणा
हैदराबाद  – बुडते जहाज वाचवण्याऐवजी त्यातून कॅप्टननेच सर्वांत आधी उडी घेतली, अशा शब्दांत भाजपचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी कॉंग्रेस आणि त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्याची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याचा संदर्भ देत चौहान यांनी कॉंग्रेसचा उल्लेख बुडते जहाज तर राहुल यांचा उल्लेख त्या जहाजाचे कॅप्टन म्हणून केला. आता कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण आहे हेच कुणाला ठाऊक नाही, अशी खिल्लीही त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना उडवली.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या चौहान यांनी त्यांच्या राज्याशी संबंधित मुद्‌द्‌यांवरही भाष्य केले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून कॉंग्रेसने मध्यप्रदेशची सत्ता मिळवली. मात्र, भाजपचे सरकार घालवल्याचा पश्‍चात्ताप आत मध्यप्रदेशातील जनतेला होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मध्यप्रदेशात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचा संदर्भ दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.