ठिकाण अन्‌ वेळ सांगा दोन हात करायला तयार

सातारा  – आपली लढाई बाजारबुणग्यांशी नसून ज्यांच्याशी आहे त्यांनी तारीख, वार आणि मैदान ठरवावे. मी दोन हात करायाला तयार आहे, असे आव्हान ना. सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले. दरम्यान, पुणे येथील कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यांचा शेतकऱ्यांशी काडीमात्र संबंध नसल्याचा टोलादेखील खोत यांनी यावेळी लगावला.

साताऱ्यात पत्रकारांशी ते बोलत होते. खोत म्हणाले, मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा कार्यक्रम स्वाभिमानीने सुरू ठेवला आहे. वास्तविक त्यांनी लोकसभेला झालेला पराभव पाचवावा. उगाच कडक लक्ष्मी अंगात येऊन थयथयाट करण्यापेक्षा संघटनेची पडझड थांबवावी. येत्या विधानसभा निवडणुकीत 49 जागा लढविण्याची वल्गना करत आहेत. मात्र त्यांचा एकही आमदार यावेळी निवडून येणार नाही, असे सांगून खोत म्हणाले, पुण्याचा पीक विमा कार्यक्रम हा शेतकऱ्यांसाठी उत्तम व्यासपीठ होते. गोंधळ घालणाऱ्यांनी त्यांची मते मांडायला हवी होती. मात्र, त्यांनी दिलेल्या घोषणा पाहता स्वाभिमानीचे नाव आता ड्रमा बाजी संघटना ठेवावे, असा टोला खोत यांनी लगावला.

आगामी निवडणुकीत रयत क्रांतीने 13 जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील माण, कोरेगाव, कराड-उत्तर आणि फलटणचा समावेश असल्याचे खोत यांनी सांगितले. त्याचबरोबर इस्लामपूरची जागा संघटनेला मिळाली तर आपण स्वतः लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, माण-खटावमधून आ. जयकुमार गोरे यांच्यासाठी जागा मागितली आहे का? असे पत्रकारांनी विचारताच खोत म्हणाले, उमेदवरीबाबत कार्यकर्त्यांना विचारात घेवून निर्णय घेतला जाईल. मात्र, आ. गोरे यांनी दुष्काळी भागात पाण्यासाठी आमदारकी पणाला लावली. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ही पाण्यासाठी संघर्ष केला. माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी निर्णायक भूमिका घेतल्यामुळे विजय मिळवता आला, असे खोत यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)