सिमेंटच्या कैदेतून झाडांची सुटका

आदर प्रतिष्ठानतर्फे आगळावेगळा उपक्रम


झाडाभोवतालचे हटवले सिमेंट

– हर्षद कटारिया

वाढत्या शहरीकरणासाठी निसर्गाचे तोडलेले लचके याचा परिणाम म्हणून यंदाचा वाढलेला उन्हाचा पारा सर्व पुणेकरांनी अनुभवला. तसेच, यात दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन ठेवण्यात पुणेकर कुठेतरी कमी पडत आहेत. झाडे लावण्यापेक्षाही त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे.

पदपथावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करणारी पुणे महानगरपालिका पदपथाचे सिमेंटीकरण करताना मानवाला दीर्घायुषी करणाऱ्या झाडांचे जीवन मात्र संपवत आहे. झाडांच्या बुंध्याशेजारी सिमेंटीकरण केल्यामुळे झाडांच्या मुळांना पाणी मिळत नाही. त्यामुळे झाडांचे आयुष्य अल्प होते. याबाबत वृक्षप्रेमी नाराजी व्यक्‍त करत आहेत; परंतु फक्‍त नाराजी व्यक्‍त करण्यापेक्षा झाडांची मोठी संख्या असणाऱ्या सहकारनगर येथे आदर प्रतिष्ठानतर्फे एक अगळा वेगळा उपक्रम राबविल्यामुळे या पावसाळ्यात झाडांना पाणी मिळून ते सुद्धा दीर्घायुषी होणार आहेत.

वाढत्या तापमानावर नियंत्रण आणण्यासाठी आदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल माने व कार्यकर्ते यांनी सहकारनगर, तळजाई भागात अनेक झाडांचे बुंध्यापर्यंत सिमेंट, डांबर, रॅबिट व क्रश सॅंडचा दोन ते अडीच फूट थर आहे. यामुळे झाडांना पाणी मिळत नसल्याने झाडाचे आयुष्य कमी होते. शहरभर इमारत, रस्ते सिमेंटीकरण होत असल्याने झाडाला पाणी मिळण्याची किंवा जमिनीत मुरण्याची प्रक्रियाच थांबली आहे.

निसर्गचक्र व निसर्ग साखळीच बंद पडत आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणजे खालावलेली भूजल पातळी आताच सोसण्यापलीकडे गेलेले तापमान येणाऱ्या काळात केवळ असह्य असे वातावरण होणार आणि हा निसर्गाचा प्रकोप वाढत जाणार यावर उपाय म्हणून राहुल माने यांनी गेल्या सहा वर्षांपासून करत असलेल्या कामाला व्यापक स्वरूप देत आदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. या उपक्रमातून झाडे वाचण्याचा अंकुर फुटत आहे. प्रतिष्ठानतर्फे पहिला टप्पा 55 झाडे जी सिमेंटने वेढलेली होती. त्यांच्या भोवतालचे 2 ते 3 फुटांपर्यंत असलेले कॉंक्रीट काढून तेथे खत, माती, टाकून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करून त्यांना मोकळा श्‍वास घेण्यासारखी परिस्थिती तयार केली. या उपक्रमाचे निसर्ग प्रेमी व स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. शहराच्या विविध भागांतील झाडांना पाणी मिळून ती जिवंत राहील्यास आपणही निरोगी आयुष्य जगू शकू. यासाठी अशा उपक्रमाचा आदर ठेवून आदर्श घेणे गरजेचे आहे. झाडांच्या बुंध्यापर्यंत केलेले सिमेंटीकरण यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाहीच उलट जोराचा पाऊस-वारा आला तर झाडे उन्मळून पडतात. म्हणून आपण स्वखर्चाने यासाठी काम करत असल्याचे राहुल माने यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)