शैक्षणिक शुल्क वाढीला पालकांचा विरोध

सेंट जोसेफ स्कूलचा प्रस्ताव : निर्णय होईपर्यंत शुल्क न भरण्याचा इशारा

लोणावळा – येथील सेंट जोसेफ प्री प्रायमरी आणि प्रायमरी हायस्कूल ने 60 टक्के शूल्क वाढीचा प्रस्ताव पालकांसमोर मांडल्याने पालकांमध्ये कमालीचा आक्रोश बघायला मिळला. शाळेच्या या शूल्क वाढ प्रस्तावाला विरोध करताना जोवर हे वाढीव शूल्क कमी करण्यासंदर्भात शाळा प्रशासन काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत शूल्कच न भरण्याचा एकमुखी निर्णय पालकांनी आज (गुरुवारी) बैठकीत घेतला आहे.

सेंट जोसेफ प्री प्रायमरी आणि प्रायमरी हायस्कूल ही लोणावळा शहरातील इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. यंदाच्या वर्षी शाळा सुरू होताच पहिल्याच आठवड्यात शाळा प्रशासनाने एकूण “ट्युशन फी’च्या 60 टक्के शूल्क वाढविण्याचा प्रस्ताव पालकांसमोर ठेवला. ही रक्कम खूपच मोठी असल्याने तसेच नियमबाह्य असल्याने पालकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करीत शाळा प्रशासनाला निवेदन दिले. पालक प्रतिनिधी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यात याबाबत चर्चा झाली.

कोणत्याही शाळेला सरकारी नियमानुसार पालक प्रतिनिधी सोबत चर्चा करून 15 टक्के शूल्क वाढ करता येते, मात्र याठिकाणी पालकांना किंवा पालक प्रतिनिधींसोबत काहीही चर्चा न करता अचानक भरमसाठ शूल्क वाढ करणं हे नियमबाह्य असून पालकांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला. तसेच स्कूल डेव्हलपमेंट फंड, संगणक फी, को-करीक्‍युलर ऍक्‍टिव्हीटी च्या नावाखाली दरवर्षी प्रत्येक मुलाकडून जे पैसे वसूल केले जातात ते देखील नियमबाह्य असून, ते पैसे नक्की कुठं खर्च केले जातात हे शाळेनं दाखवावे, अशी मागणी पालकांनी यावेळी केली.

यावर शाळेच्या मुख्याध्यापिका वनेसा फर्नांडीस यांनी अद्यापी कोणत्याही प्रकारची शूल्क वाढ करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही केवळ शूल्क वाढीचा प्रस्ताव पालकांच्या समोर ठेवला आहे. शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनवाढ करणे गरजेचे असल्याने शूल्क वाढवण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. पालकांच्या भावनांचा आम्हाला आदर असून त्यांचं म्हणणं व्यवस्थापनापुढे पोचवलं जाईल, असे आश्‍वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)