23 तारखेच्या शुभमूहुर्तावर कळणार जावली कुणासाठी धावली?

मेढा – सातारा लोकसभेच्या निवडणुकीत जावली कुणासाठी धावली येत्या 23 तारखेची, वाट पहावी लागणार आहे. जावली तालुक्‍यातील एकूण 152 केंद्रावर सरासरी 55/56 टक्के मतदान झाले आहे, यावेळची परिस्थिती वेगळी असून तालुक्‍यात राष्ट्रवादी की शिवसेना आघाडी घेणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. मेढा हे शहर तालुक्‍याचे ठिकाण असल्याने मेढा शहरात सरासरी 60 टक्के मतदान झाले असून मेढ्याच्या आजुबाजूच्या गावामध्ये काही ठिकाणी 50/60/70 असे कमी जास्त टक्केवारी झाली.

डोंगर मुऱ्यावर 50 टक्के मतदान झाले. मामुरडी, याठिकाणी उष्णतेमुळे सात ते आठ वेळा मशीन बंद पडण्याचा प्रकार घडला. तसेच जवळवाडीतही मशीन सुरु न झाल्याने नागरिकांना काही काळ थांबावे लागले. तहसील कार्यालय जवळ असून सुध्दा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. या तालुक्‍यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व असल्याने गतवेळेस खासदार उदयनराजे भोसले यांना मताधिक्‍य दिलेला तालुका आहे. परंतु यावेळी मात्र परिस्थिती वेगळी झाली आहे. विरोधी उमेदवार तगडा व माथाडी कामगार नेता आहे.

जावली तालुक्‍यात माथाडी कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तसेच काही नेते मंडळींची मैत्रीपूर्ण संबंध असल्याने याच आधारावर कोणाचा टक्का वाढणार? याची उत्सुकता नक्कीच रहाणार आहे. लोकसभा निवडणुकीत या राष्ट्रवादीच्या,बालेकिल्ल्यात यावेळी स्थानिक नेत्यांच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत. या तालुक्‍यात माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने माथाडींची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे त्यामुळे आता निकालानंतर कळणार आहे की जावळीकरांनी नेमका कौल कोणाच्या बाजुने दिला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्याकडे तालुक्‍यातील केडेंबे केळघर कुसुंबी या गावातील सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु ती मागणी किमान या निवडणुकीत तरी उदयनराजे यांच्याकडून मान्य होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु या प्रश्‍नाकडे खासदारांनी दुरलक्ष केले. त्यामुळे केडंबे, कुसुंबी, केळघर या भागातील शेतकऱ्यांनी आपली निर्णायक मते कोणाच्या बाजुने टाकली हे येत्या 23 तारखेला कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)