माहुलीची उपसा यंत्रणा चिखलामुळे जाम

फिल्टर बेडची दुरुस्ती सुरू गढूळ पाणी उकळून पिण्याचे प्राधिकरणाचे आवाहन

अल्पावधीतच पाइपलाइन लिकेज

शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरुन शासनाने सातारा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम पूर्ण होऊन आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यातच पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली नवीन पाइपलाइन वारंवार लिकेज होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सातारा – सातारा शहर व लगतच्या उपनगरांना मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने मात्र माहुली उपसा केंद्राचा फिल्टर बेड खराब झाल्याचे कारण देत त्याची दुरुस्ती हाती घेतली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत सातारा शहर व गोडोली, करंजे, शाहूपुरी, विलासपूर, सदरबझार या भागांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे शहरात जवळपास 17 हजारावर ग्राहक आहेत. यंदा धोम धरणाकडून कृष्णेच्या पात्रात प्रचंड गाळ वाहून आल्याने माहुलीची उपसा यंत्रणा चिखलामुळे बंद पडल्याची माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली.

शहर व उपनगरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठा खंडित होता. आणि मंगळवारपासून गढूळ पाणी घेऊ लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. माहुलीच्या उपसा केंद्राची गाळणी चिखलामुळे जाम झाली आहे. त्यामुळे उपसा यंत्रणा वारंवार बंद पडत असून दररोज 25 एमएलडी पाणी उचलण्यास अडचणी येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पंधरा कर्मचारी कामाला लावून फिल्टर बेडची दुरुस्ती व उपसा यंत्रणेजवळचा गाळ उपसण्याची तातडीची मोहिम हाती घेतली आहे. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले. कृष्णा नदीतून पाणी उचलून भैरोबा, करंजे, बाबर कॉलनी, गोडोली व प्राधिकरण अशा एकूण पाच टाक्‍यांमधून सतरा हजार नागरिकांना वितरित होते.

वाई व सातारा शहरातील ग्राहकांना अवैध नळजोडणी करुन देणारी टोळी सक्रिय होती. या टोळीने शहरात ठिकठिकाणी अवैधपणे प्रादिकरणाची पाइपलाइन खोदली. त्यामुळे गटाराचे पाणी पाइपलाइनमध्ये जात आहे. याचाच प्राधिकरणाला फटका बसत असल्याचा आरोप होत आहे. 18 जूनला रात्री जलशुध्दीकरण यंत्रात बिघाड आला. त्यामुळे पाणी फिल्टर झाले नाही. कृष्णा उद्‌भवातून दोन टप्प्यात पाणी उचलले जात आहे. त्यामुळे पाणी थोड्या प्रमाणात अशुध्द असू शकते. मात्र ही समस्या गांभीर्याने घेत जलशुध्दीकरण यंत्राची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरवासीयांना येत्या दोन दिवसांत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.

तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून खंडीत पाणीपुरवठ्याला शहरवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. आणि आता गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. सतत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने सातारा शहरवासीयांची धाकधूक वाढली आहे. त्यातच गढूळ पाण्याचा पुरवठा म्हणजे आजाराला आमंत्रण. त्यामुळे प्राधिकरणाची वितरण व्यवस्था टीकेच्या रडारवर आली आहे. विशेष म्हणजे शहरवासीयांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी माहुली येथे पाणी पुरवठा योजनेतंर्गत येथे जलशुध्दीकरण यंत्र लावण्यात आले आहे. मात्र यानंतरही गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र यानंतरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गंभीर नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे.

संजय व्ही. गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराट्र जीवन प्राधिकरण, सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)