#IPL2019 : कोलकाताचा मुंबईवर 34 धावांनी विजय

कोलकाता – फलंदाजांनी केलेल्य धडाकेबाज कामगिरीनंतर गोलंदाजांच्या तिखट माऱ्याच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 34 धावांनी पराभव केला.

यावेळी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 2 बाद 232 धावांची मजल मारत मुंबई इंडियन्स समोर विजयासाठी 233 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना मुंबई इंडियन्सला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 198 मजल मारता आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी 233 धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली.

सलामीवीर डी कॉक एकही धाव नकरता माघारी परतला. तर, कर्णधार रोहित शर्मा 12 धावा करुन परतल्याने सुरुवातीलाच मुंबईला दोन धक्‍के बसले. यानंतर एविन लुईस आणि सुर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लुईस 15 धावा करुन परतला तर सुर्यकुमार यादवही 26 धावा करुन परतल्याने मुंबईची 4 बाद 58 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी दोघांनी 53 धावांची भागिदारी करत मुंबईला शतकी मजल ओलांडून दिली.

मात्र, पोलार्ड 20 धावा करून परतल्यानंतर हार्दिक पांडयाने कृणाल पांड्याच्या साथीत फटकेबाजी करत मुंबईच्या विजयाच्या आशा जागृत केल्या. यावेळी पांड्याने केवळ 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, धावा आणि चेंडूंमधील अंतर कमी करण्याच्या नादात पांड्या 34 चेंडूत 91 धावा करुन बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना आवश्‍यक धावगती राखता न आल्याने मुंबईला 198 धावांचीच मजल मारता आली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या कोलकाताच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. कोलकाताच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये संघाला 50 धावांची मजल मारुन दिली. यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात ख्रिस लिन 54 धावांची खेळी केली. दोन्ही सलामीवीरांनी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाताने दहा षटकांमध्ये 1 बाद 97 धावांची मजल मारली.

यावेळी शुभमन गिलने केवळ 32 चेंडूत चार चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावत कोलकाताला अर्धशतकी मजल मारुन दिली. तर, आंद्रेरसेलने सुरुवातीला सावध खेळ करत भागिदारी करण्यावर भर दिला. यावेळी आपल्या अर्धशतकानंतर शुभमनने आपल्या फटकेबाजीचा वेग वाढवत राहुल चहरच्या षटकांत 2 षटकार खेचत कोलकाताला 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने धावा करायला सुरुवात केली.

मात्र, 45 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 76 धावा करुन गिल परतला. गिलने बाद होण्यापूर्वी, रसेलच्या साथीत 5.5 षटकांत 62 धावांची भागिदारी नोंदवली. गिल बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकला साथीत घेत आंद्रे रसेलने फटकेबाजीला सुरुवात केली. यावेळी रसेलने मुंबईच्या हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगायांच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करत कोलकाताला यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा 200 धावांची मजल मारुन दिली. यावेळी रसेलने नाबाद 80 तर कार्तिकने नाबाद 15 धावा करत कोलकाताला 232 धावांची मजल मारून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)