पुणे – स्वच्छ सर्वेक्षणात प्रत्येक विभाग होणार सहभागी

आयुक्तांचे आदेश : प्रत्येक विभागासाठी एक समन्वय अधिकारी

पुणे – स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहराचे मानांकन सुधारण्यासाठी आता यात पालिकेच्या सर्व विभागांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. गेली तीन वर्षे या सर्वेक्षणाची जबाबदारी केवळ घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे देण्यात आली होती. मात्र, हे सर्वेक्षण एका विभागाशी संबंधित न ठेवता सामूहिक जबाबदारी दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाकडून एका समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे.

मागील वर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेचे स्वच्छ शहराचे मानांकन 10 वरून थेट 37 वर पोहचले आहे. त्यामुळे एका बाजूला पहिल्या पाचमध्ये येण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेला चांगलीच चपराक बसली आहे. त्यातच आता केंद्राकडून या सर्वेक्षणात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने या वर्षी पासून ड्रेनेज तसेच जलस्रोतांच्या स्वच्छतेचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तांकडून या दोन्ही विभागांसह, पालिकेच्या इतर सर्व विभागांवरही योजनेची जनजागृती तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे सर्वेक्षण केवळ एखाद्या विभागाचे नसून ते सर्व शहरासाठीचे आहे. त्यामुळे सर्व विभागांनी त्यात सहभागी व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.