अग्रलेख : अमर्त्य सेन यांचे रामचिंतन

लोकसभा निवडणुकीपासून बंगालमध्ये “जय श्रीराम’ अशा घोषणा देत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना डिवचण्याचे सततचे प्रयत्न भाजपने चालवले आहेत. यात रामभक्‍तीपेक्षा खोडसाळपणाच अधिक होता; हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजप समर्थकांनी “जय श्रीराम’चे नारे द्यायचे आणि तृणमूल समर्थकांनी त्यांच्या अंगावर धावून जायचे, असा थिल्लरपणा लोकांनी त्या काळात वारंवार अनुभवला. या विषयावर बऱ्याच कालावधीनंतर आता ‘नोबेल पुरस्कार’ विजेते अमर्त्य सेन यांनीही आपले मनोगत लोकांना ऐकवले आहे.

जाधवपूर विद्यापीठात बोलताना अमर्त्य सेन यांनी, “जय श्रीराम’ ही घोषणा बंगाली संस्कृतीशी मिळतीजुळती नाही,’ असे विधान केले आहे. “बंगालमध्ये दुर्गामातेला अधिक लोक पूजतात आणि दुर्गामाता ही बंगाली संस्कृतीची प्रतीक आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. “जय श्रीराम’ घोषणेचा वापर लोकांवर हल्ले करण्यासाठी केला जातो,’ असेही त्यांनी म्हटले आहे. थोडक्‍यात, त्यांच्या वक्‍तव्यामुळे आता राम आणि दुर्गा माता यांच्या भक्‍तांमध्ये तेथे वादंग माजू शकते. अमर्त्य सेन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाने या विषयावर आपले चिंतन जाहीर स्वरूपात मांडावे काय, यालाच आता आक्षेप घेतला जाऊ लागला असून, मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी, अमर्त्य सेन यांच्या वक्‍तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे असे की, “अमर्त्य सेन यांच्यासारख्यांनी अशा विषयांवर भाष्य करण्यापेक्षा स्वत:च्या विषयांवरच स्वत:ला मर्यादित ठेवावे.’ आता अन्यही भाजप समर्थक सेन यांच्यावर तुटून पडतील आणि किमान आठवडाभर हा विषय सुरू राहील. “रामाचा आणि बंगालचा संबंध नाही,’ असे सेन यांनी म्हटलेले नाही. पण त्यांनी तसेच म्हटले आहे, असे भासवून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न सुरूच राहील.

सेन यांचे म्हणणे शब्दश: घेण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ महत्त्वाचा आहे. बंगाली संस्कृतीत दुर्गामातेचाच अधिक प्रभाव आहे त्यामुळे “जय श्रीराम’ची संस्कृती तेथे नाही. ही उत्तर भारताची संस्कृती आहे, असेही त्यांना सूचित करायचे असावे आणि बंगाली संस्कृतीवर उत्तर भारतीय संस्कृती थोपवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असे त्यांना म्हणायचे असावे. बंगाली संस्कृतीत कालीमाता किंवा दुर्गामाता किती खोलवर रूजली आहे हे समजावून सांगताना सेन यांनी म्हटले आहे की, “आपल्या चार वर्षांच्या नातीला “तुझा आवडता देव कोणता,’ असा प्रश्‍न विचारल्यावर, तिने “दुर्गामाता’ असेच उत्तर दिल्याचा दाखला त्यांनी दिला.

सेन यांना हिंदू देवतांमध्ये वाद निर्माण करायचा नाही; किंवा दोन्ही देवतांच्या भक्‍तांमध्ये भांडणही लावायचे नाही. पण “जय श्रीराम’च्या घोषणांमागे लपून जे राजकारण सध्या बंगालमध्ये सुरू आहे, त्याविषयी लोकजागृती करण्याचाच सेन यांचा उद्देश आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठांच्या या चिंतनाचा गाभा आपण लक्षात घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. “जय श्रीराम’ ही राजकीय घोषणा असू नये अशी अपेक्षा व्यक्‍त करणे गैर नाही. अशा धार्मिक स्वरूपाच्या घोषणा जेव्हा राजकीय स्वरूप घेतात, तेव्हा खरी समस्या उभी राहते. रामाच्या नावाने सध्या जो राजकीय धुडगूस सुरू आहे, तो खऱ्या राम भक्‍तांनाही मान्य नसावा. पण लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून राजकीय पोळी भाजण्याचा हा जमाना आहे आणि हीच जर सध्याची पद्धत असेल तर आमच्या बंगालमध्ये दुर्गामातेला रामापेक्षा जास्त मान आहे. त्यामुळे उत्तरेतील संस्कृती बंगालमध्ये रूजवण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगण्याचा त्या त्या विचारवंताना अधिकार आहे, हेही मान्यच करावे लागेल.

तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपचा बंगालमध्ये प्रभाव वाढू नये, म्हणून भाजपची विचारसरणीच बंगालबाहेरची विचारसरणी आहे, असा समज लोकांमध्ये ठसवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. भाजपच्या लोकांना “बाहेरचे लोक’ म्हणून त्यांनी सातत्याने हिणवले आहे. त्यावर अमर्त्य सेन यांनी “जय श्रीराम’ घोषणेचा बंगालच्या संस्कृतीशी संबंध नाही, असे ठोस विधान करून चांगलीच कडी केली आहे. सेन यांचे हे वक्‍तव्य लोकसभा निवडणुकीत राजकीय झटका बसलेल्या ममतांना बराच मानसिक आधार देणारे ठरले आहे. “जय श्रीराम’ ही उन्माद निर्माण करणारी घोषणा असू नये, लोकांना मारझोड करण्यासाठी तरी त्याचा उपयोग होऊ नये,’ अशी सेन यांनी व्यक्‍त केलेली अपेक्षा चुकीची मुळीच नाही.

ही घोषणा म्हणजे बंगालच्या मूळ संस्कृतीवरील अतिक्रमण असल्याची भावना जर तेथील लोकांमध्ये राजकारण्यांनी दृढ केली तर त्यातून दुसरेच काही धार्मिक प्रश्‍न उभे राहू शकतात. त्यामुळे भाजपनेही आता अमर्त्य सेन यांनी व्यक्‍त केलेल्या मताशी प्रतिवाद न करता हा विषय तेथेच थांबवणे सोयीचे आणि हिताचेही ठरणार आहे. राजकारण करायला बाकीचे बरेच विषय आहेत. त्यावर लक्ष केंद्रित केले तर बंगालमध्ये याहीपेक्षा अधिक रंजक राजकारण भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसला करता येईल. ब्रिटिश काळात बंगालची फाळणी हा विषय देशभर गाजला होता. आता “दुर्गामाता आणि जय श्रीराम’ अशा धार्मिक विभागणीतून पुन्हा बंगालची सांस्कृतिक फाळणी करण्याचा उपद्‌व्याप होता कामा नये.

भारतीय जनता पक्षावर आज साऱ्या देशाची मदार आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच अधिक जबाबदारीचे वर्तन अपेक्षित आहे. ममता बॅनर्जी यांचे स्वभाव वैशिष्ट्य चिडखोरपणाचे आहे. त्यामुळे त्यांना असल्या क्षुल्लक विषयावरून अस्थिर करून राज्यातील सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजपाने करता कामा नये. राजकारणातल्या मॅच्युरिटीची जबाबदारी आता आपल्यावरही आहे, याचे भान भाजपलाही हवे. येनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून या आधीच्या काळात सातत्याने झाला आहे.

राजकारणाची गरज म्हणून भाजपने यापूर्वीच्या काळात असे काही प्रकार केले असतील, तर क्षम्य होते; पण आता केंद्रात एकतर्फी बहुमत असताना आणि देशातील अनेक प्रांतात सत्ता असताना भाजपाने “जय श्रीराम’ सारख्या घोषणांचा राजकीय वापर थांबवून धार्मिक श्रद्धास्थानांचा आदर कायम राखला जाईल, याची काळजी घेतली पाहिजे. अमर्त्य सेन यांच्या सारख्या बुजुर्ग विचारवंतांनाही बहुधा हेच सुचवायचे असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)