बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 10 वर्षे कारावास

कोल्हापूर (प्रतिनिधी) – घरासमोर अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेस खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्षांची शिक्षा व 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा निर्णय दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सोमवारी दूसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी दिला. पांडूरंग मारुती पाटील (वय 42, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) असे आरोपीचे नाव आहे. या खटल्याचे काम सरकारी वकील ऍड. अमिता कुलकर्णी यांनी पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, कणेरीवाडी येथील आरोपी पांडुरंग पाटील याने 2013 मध्ये पिडीत मुलगी घरासमोर अंगणात खेळत असताना तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. पिसाळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी वकील ऍड. कुलकर्णी यांनी सात साक्षीदार तपासले. पिडीत मुलगी, डॉक्‍टर,पिडीतेचे पालक यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य माणून न्यायाधिश पाटील यांनी कलम 375 ,354 व बाललैंगिक अत्याचार कलमानुसार आरोपी पांडुरंग पाटील यास शिक्षा सुनावली. पोलीस कॉन्स्टेबल वर्षा पाटील, वनिता चव्हाण यांनी खटल्याचे कामकाज सुरू असताना महत्त्वपूर्ण मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.