लक्षवेधी: गोंधळात गोंधळ

अशोक सुतार

लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसे नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. महाराष्ट्रात भाजप-सेना हे पक्ष काय किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादीतही गोंधळात गोंधळ पाहायला मिळत आहे. पक्षनिष्ठा काय म्हणतात, ती अनेक नेत्यांनी खुंटीला टांगून ठेवल्याचे दिसत आहे. पुण्यासारख्या महत्त्वाच्या जागेवर कॉंग्रेस पक्षाने उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास वेळ लावला आहे. तर चंद्रपूरमध्ये कॉंग्रेस पक्षाला उमेदवार बदलावा लागला आहे. सांगलीत स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातवानेही भाजपकडे विचारणा करून अखेर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे दिली, तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वत:हून राजीनामा द्यायच्या मनःस्थितीत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीअंतर्गत असलेला विरोध आता कुठे शमला आहे. नगरच्या राजकारणात अपेक्षित नव्हती एवढी घडामोड घडली आहे. कारण नगर हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला मतदारसंघ आणि तेथील कॉंग्रेसचे स्टार प्रचारक, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मुलासाठी म्हणजे सुजय विखे पाटील यांच्यासाठी शरद पवारांना केलेला आग्रह. त्यात पवारांनी त्यांना दिलेला नकार यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपकडे घेतलेली धाव यांमुळे नगर येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची बिघाडी झाली आहे. राज्यातल्या आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या या परिस्थितीला राज्यातल्या नेतृत्वातील आत्मविश्‍वास आणि राज्य आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यात योग्य समन्वय नसणे, हेच एकमेव कारण वाटते.

सध्या सगळीकडेच गोंधळाचे वातावरण दिसत आहे. अशोकराव चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी डळमळीत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, माझे पक्षात कोणीही ऐकत नाही. अशोक चव्हाण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण दिल्लीशी थेट संपर्कात असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक ही मंडळी आहेत. राज्यातल्या कमिटीने काही निर्णय घ्यायचे आणि केंद्रीय नेतृत्वाच्या जवळील लोकांनी त्यात फेरफार करायचा, अशी समस्या यामुळे निर्माण होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वत्र विरोधी पक्षांची गोची केली आहे. या प्रतिकूल परिस्थितीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाणे आवश्‍यक आहे. अब्दुल सत्तार यांनी नाराजीचे कारण देऊन बंडाचे राजकारण करताना दिसून येत आहेत. पक्षाचे कुणाला देणेघेणे नाही, अशी गोंधळाची परिस्थिती आहे. या गोंधळाचा परिणाम उमेदवारांवर, त्यांच्या तयारीवर होत आहे.

मुंबईत निवडणुका तोंडावर असताना कॉंग्रेसने अध्यक्ष बदल केला, याचा नक्कीच परिणाम होणार आहे. कॉंग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. कोल्हापूरमध्ये काही कॉंग्रेसवाले शिवसेनेबरोबर गेले. उस्मानाबादमध्ये हाच प्रकार पाहावयास मिळत आहे. सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये नुकतेच गेले आहेत.

महाराष्ट्रातली कॉंग्रेस ही कायम गटातटाची कॉंग्रेस राहिली आहे. या सगळ्या गटांना एकसंध बांधून ठेवणारा नेता महाराष्ट्रात कुणी नव्हता. विलासराव देशमुख यांच्यानंतर कॉंग्रेसला त्या प्रमाणात एकसंध ठेवणारा नेता राहिला नाही. उमेदवार ठरवताना चर्चा होणे आवश्‍यक आहे, गावपातळीवरील नेत्यांना विश्वासात घेणे आवश्‍यक आहे, त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत. तसे कॉंग्रेसमध्ये होत असल्याचे नाराजीवरून दिसत नाही.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली, त्यामुळे त्यांना संघटना बांधणीसाठी वेळ देता आला नाही. राज्यात प्रभारी म्हणून मध्यंतरी मोहन प्रकाश यांची नियुक्ती केली. त्यानंतर अचानक मल्लिकार्जुन खर्गे आले. यामुळे मग कॉंग्रेसकडे पूर्णपणे कुणी लक्ष दिले नाही. सत्ता भाजपकडे असल्यामुळे आता अनेकजण उमेदवारी मिळवण्यासाठी तिकडे जात आहेत, असे चित्र दिसत आहे. संजय निरुपम मुंबईत सगळ्या गटांना बरोबर घेऊन चालले नाहीत. शिवसेनेतून आलेले, अशीच निरुपम यांची प्रतिमा राहिली. सांगली हा स्व. वसंतदादांचा मतदारसंघ आहे. या दिग्गज नेत्याच्या जिल्ह्यात कॉंग्रेसला उमेदवारच मिळत नाही, याहून वाईट स्थिती दुसरी काय असू शकते?

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वत: राजीनामा द्यायच्या तयारीत आहे, असे म्हणतात. यावरून कॉंग्रेससाठी किती चिंतेचे वातावरण आहे, हे दिसून येते. कॉंग्रेसमध्ये अशी प्रतिकूल परिस्थिती अनेकवेळा जरी आली तरी हा पक्ष पुन्हा एकदा उभारी घेतो, असे अनेकवेळा दिसून आले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे नेतृत्व कॉंग्रेसला सावरणार का, महाराष्ट्रातील अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील कॉंग्रेसला यश मिळवून देणार का, हे येत्या काळात पाहायला मिळेलच. तूर्तास, पक्षातील राजकीय परिस्थिती सावरण्याची संबंधित नेत्यांनी चिंतन करण्याची
गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)