“ब्रेकडाऊन’ ठरतायेत वाहतूक कोंडीचे कारण

ब्रेकडाऊन बस मार्गाबाहेर काढण्यासाठी बीआरटीकडे यंत्रणाच नाही
बंद पडलेल्या पीएमपीमुळे बीआरटी मार्गच बंद

पिंपरी –
निगडी येथील प्राधिकरण कॉर्नर लगतचा बीआरटी मार्गात पीएमपीची बस बंद पडल्याने येथील संपूर्ण बीआरटी मार्ग बुधवारी (दि.17) तब्बल दोन तास बंद करण्यात आला. हे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू केलेल्या “बीआरटी’चे ब्रेकडाऊन वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहेत.

शहरातील नागरिकांना जलद गती वाहतूक सुविधा मिळावी यासाठी करोडो रुपये खर्च करुन बीआरटी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, बीआरटी मार्गातून बंद पडलेली बस बाहेर काढण्यासाठी जागा नसल्याने एक बस बंद पडल्यावर संपूर्ण मार्गच बंद करण्यात येतो. बीआरटी मार्गाच्या या उणिवेमुळे संपूर्ण मार्गच बंद करण्याची नामुष्की बीआरटीवर वारंवार येत आहे. मात्र, याबाबत बीआरटी प्रशासन सुधारणा करण्याऐवजी पीएमपी प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहे.

बुधवारी दुपारी चार वाजता निगडी येथील प्राधिकरण कॉर्नरच्या बीआरटी मार्गावर निगडी पीएमपी आगाराची सीएनजीवर चालणारी मार्ग क्रमांक 276 ची व बस क्रमांक एम.एच.12,एच बी 1727 नंबरची बस काही बिघाडामुळे बस थांब्यावरच बंद पडली. यामुळे मार्गात दुसऱ्या येणाऱ्या बसेसना पुढे जाता येत नव्हते. यामुळे बीआरटी मार्गच बंद करावा लागला होते. याबाबत निगडी पीएमपी आगाराशी संपर्क केला असता त्यांना याबाबत कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली.
बीआरटी मार्ग हा लहान असतो, एखादी बस अडकली तर मागील बसेसही अडकतात आणि मार्ग बंद होतो. यामुळे बीआरटी मार्गात चांगल्या प्रतीच्या बसेस ठेवाव्यात, अशी मागणी सुरुवातीपासून होत होती. परंतु दापोडी ते निगडी मार्गावर उद्‌घाटन झालेल्या आठवड्यातच बस बंद पडण्यासही सुरुवात झाली आहे.

सध्या शहरात चिंचवड ते दापोडी दरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी अगदीच थोडा रस्ता उरला आहे. त्यातच बीआरटी मार्ग सुरू करण्याच्या घाईने हा रस्ता आणखीच अरुंद झाला. त्यात आता ब्रेकडाऊनमुळे बीआरटी मार्ग बंद पडल्यावर बीआरटी बसेस देखील उरलेल्या रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत आहे.
करोडो रुपये खर्च केलेल्या बीआरटी मार्गाच्या या दूरवस्थेबाबत प्रवासी नाराजी व्यक्‍तकरत आहेत. दोन तासाहून अधिक वेळ झाला तरी मार्गातील बस बाहेर काढली नव्हती. जुन्या पुणे-मुंबई महार्गावर आधिच वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यातच बीआरटी मार्ग सुविधे ऐवजी अडचण निर्माण करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)