विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह कार्यकर्ते व महिला सहभागी
श्रीगोंदा – महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदे शहरात रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत महिला आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धनश्री विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यांमध्ये प्रचाराच्या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. महिला मतदारांबरोबच समाजातील विविध घटकांशी थेट संपर्क साधून त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. या भागातील पाण्याच्या प्रश्नांबरोबरच युवकांच्या रोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी आहे ही भुमिका त्यांनी मतदारांसमोर मांडली.
श्रीगोंदा शहरात पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी छोटे व्यावसायिक, व्यापारी या सर्वांशीच आज संपर्क साधला. यावेळी त्यांच्या अडचणी विचारण्यात आल्या. विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि युवक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेचे मतदारांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले.