गटारीचे पाणी सोडले जातेय प्रवरा नदीत!

अकोले नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नदीचा प्रवाह प्रदूषित

अकोले – “एकीकडे स्वच्छतेचा नारा! तर दुसरीकडे मात्र गटारीचे पाणी चालले प्रवरा,’ असे अकोले नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळे चित्र पुढे आले आहे. अकोले नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात प्रशासनाने, “शौचालय घरोघरी ! शांतता नांदेल दारोदारी’ असा नारा दिला होता. या उपक्रमात त्यांना यशही मिळाले. सरकारने या नगरपंचायतीला एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले. त्यानंतर प्लास्टिकबंदीचा नारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला. त्याची तत्परतेने दखल घेऊन अकोले नगरपंचायतीने “स्वच्छता मोहिमे’वर विशेष लक्ष दिले. प्रभागानुसार शहरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी गटाराची पाणी तुंबून होणारी दुरवस्था टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

फळबाग विक्रेते, दुकानदार यांनाही प्रशासनाने सळो की पळो करून सोडून प्लास्टिक पिशव्या बंदीवर विशेष जोर दिला होता. त्याचे फलितही चांगले दिसून आले. त्यासाठी प्रत्येक प्रभागात कचरा संकलनाची सोय केली गेली. घंटागाड्या सुका कचरा, ओला कचरा यांचे वर्गीकरण करून गोळा करत असल्याने त्याला ही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पण नगरपंचायतीचे सांडपाणी व्यवस्थापन मात्र कोलमोडून पडले आहे. एवढेच नव्हे, तर जागोजागी तुंबणाऱ्या गटारांचे पाणी प्रसंगी रस्त्यावर आले, तर ते समजण्यासारखे आहे. पण ते चक्क प्रवरा नदीपात्रातच येते आहे व ही गंभीर बाब आहे. गटारीचे पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले गेल्याने ही बाब नक्कीच भूषणावह नाही.

नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जवळपास पंचवीस हजार लोकवस्ती आहे. जवळूनच प्रवरा नदी वाहते आहे. नगरपंचायत पाणीपुरवठा योजना सीडफार्मच्या विहिरीतून करत आहे. अशा प्रकारचे सांडपाणी व्यवस्थापन असल्यास व भविष्यात असे पाणीपुरवठा योजनेतून ते जर पाणीपुरवले गेले, तर ते आरोग्याला हानिकारक ठरेल, अशा प्रकारची भावना जनतेमध्ये दिसून येत आहे. मात्र सध्या तरी या पाणीपुरवठा योजनेला लगत अशा प्रकारचा सांडपाणी प्रवाह जाताना दिसत नाही, हेही महत्त्वाचे आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन नीट होत नसल्याने प्रवरा नदीपात्रात हे पाणी वाहते आहे. नदीपात्रात ते साचत आहे. विशेष बाब म्हणजे प्रवरा नदीपात्रात आवर्तन नसल्याने व नदीपात्र कोरडे पडले असल्याने ही बाब प्रकर्षाने ठळकपणे येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या लक्षात येते. यासाठी नदीकाठी असणारे चेंबर्स वेळोवेळी उपसण्याची गरज आहे. मात्र ते होत नाही. कर्मचारी व प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नाही किंवा कर्मचाऱ्यांवर वचक नाही असेही यातून स्पष्ट होते.

याबाबत मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्याशी संपर्क साधला, असता त्यांनी गटारीचे पाणी नदीपात्रात जाते, ही बात कबूल केली. मात्र त्यावर लवकरच कारवाई केली जाईल, अशी भाषा त्यांनी केली. मात्र त्यालाही जवळजवळ वाटाण्याच्या अक्षता लागल्याचे दिसून आले. याबाबत नगरपंचायतीच्या विरोधात आंदोलन छेडण्याची भूमिका नगरसेवक व शिवसेनेचे नेते प्रमोद मंडलिक यांनी घेतली आहे. ते म्हणाले, व्यवस्थापनामुळे फोल ठरला आहे. आरोग्यासाठी एका वर्षासाठी 55 लाख रुपयांचा ठेका दिला असून, तो ठेका केवळ नाममात्र आहे का? मुख्याधिकारी आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष, आरोग्य समिती यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन कारवाई न केल्यास या विरोधात आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.