सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड बुधवारी (दि. 1) होणार आहे. या निवडीकरता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल दि. 21 सप्टेंबर रोजी संपत होता. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांना दि. 21 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने संजीवराजे, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, राजेश पवार, उदय कबुले यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. तर उपाध्यक्षपदासाठीही जोरदार रस्सीखेच आहे.
सातारा येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या बहुतांश सदस्यांनी पुन्हा संजीवराजे यांनाच संधी देण्याची मागणी केली होती. यावेळी मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होईल हे चित्र स्पष्ट होणार होते.
सोमवारी विस्तार झाला. मात्र, अद्यापही अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार, हे स्पष्ट झालेले नाही. बुधवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. दुपारी दोन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर दुपारी 2.20 ते 2.30 या वेळेत नामनिर्देशन पत्रे माघारी घेता येणार आहेत. आवश्यकता भासल्यास मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार हे मंगळवारी रात्रीपर्यंत ठरले नव्हते. पक्षश्रेष्ठी ऐनवेळी कोणाला संधी देतात, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.