सभापतिपदी किंद्रे, उपसभापतिपदी जाधव
भोर (प्रतिनिधी) – भोर तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याने सभापती, उपसभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे अबाधित राहिले आहे. सभापतिपदी श्रीधर किंद्रे तर उपसभापतिपदी दमयंती जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, दमयंती जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापतिपदी श्रीधर किंद्रे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या दमयंती जाधव यांची अडीच वर्षासाठी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांनी काम पाहिले. या वेळी भोरचे तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, नायब तहसीलदार बबन तडवी, माजी सभापती मंगल बोडके, माजी उपसभापती लहूनाना शेलार, रोहन बाठे, पुनम पांगारे रणजित शिवतरे, स्वप्निल जाधव, अमोल पांगारे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचा पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सत्कार केला.तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार असून जि. प. आणि भोर तालुका पंचायत समितीच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी कटीबद्ध राहील असा विश्वास किंद्रे यांनी यावेळी व्यक्त केला.