वीसगाव खोरे, (वार्ताहर) – इतर बँका व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नफा होणार असेल तरच ग्रामीण भागात शाखा उघडतात. याच्या उलट जिल्हा बँक मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरात किती शेतकरी आहेत, त्यांना किती लांब यावे लागते, त्यांना त्रास होऊ नये, बँकेला नफा होणार का तोटा होणार याचा विचार न करता ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा बँक कायमच तत्परतेने सेवा देण्याचे काम करते, असे प्रतिपादन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
प्रा.दुर्गाडे पुढे म्हणाले, भोर तालुक्यात जिल्हा बँकेवर आमदार संग्राम थोपटे व भालचंद्र जगताप, असे दोन संचालक आहेत. दोघेही सहकारात राजकारण न आणता कायमच बँकेचे हीत पाहून एकजुटीने शेतकऱ्यांसाठी काम करीत असतात.
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम डोंगरी वीसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर येथील जिल्हा बँक शाखेचे नूतनीकरण व एटीएम उद्घाटन समारंभप्रसंगी डॉ.दुर्गाडे बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक भालचंद्र जगताप, प्रवीण शिंदे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, मुख्याधिकारी अनिरुद्ध देसाई ,विकास अधिकारी मुकुंद थोपटे, विभागीय अधिकारी विनोद काकडे,ख.वि.संघ अध्यक्ष अतुल किंद्रे,उपाध्यक्ष अतुल शेडगे,संचालक मधूकर कानडे,संदीप नांगरे,केदार देशपांडे,मनोज खोपडे ,शिवाजी पाटणे ,बँक व्यवस्थापक सत्यवान आवाळे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.