पुणे: भारतीय आयुर्विमा महामंडळ व ओ एन जी सी पुरस्कृत महाराष्ट्र कॅरम संघटना व पुणे कॅरम संघटना आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघ करंडक स्पर्धेच्या स्विस लीग एकेरी गटात भारताच्या जहीर पाशाने सुवर्ण तर अनिल मुंडे आणि के. श्रीनिवास यांनी अनुक्रमे रजत, ब्रॉंझपदक पटकावले.
महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा, कार्याध्यक्ष भारत देसडला, मानद सचिव यतीन ठाकूर, उपाध्यक्ष अरुण केदार, पुण्याचे सचिव नंदू सोनावणे यांच्या सहकार्याने पी.वाय.सी. हिंदू जिमखान्याच्या हॉलमध्ये सुरु आहे. स्विस लीगच्या आठव्या फेरीमध्ये भारताच्या जहीर पाशाने अत्यंत आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या इर्शाद एहमदचे 25-10 असा संघर्षपूर्ण विजय मिळवीत सुवर्ण पदक पटकावले.
भारताच्या अनिल मुंडेने सहज बांगलादेशच्या रहमान हाफिजूरच्या 25-08 असा पराभव करून रजतपदकाची कमाई केली तर, के. श्रीनिवास ने 25-0 असा विजय मिळवीत ब्रॉंझपदक मिळविले. राजेश गोईलने आएशा मोहंमदचा 25-05 असा पराभव केला. काजल कुमारीने अभिजीत त्रिपणकरचा 25-15 असा पराभव करून पाचवे क्रमांक पटकाविले.
या स्पर्धेत आत्तापर्यंत नऊ ब्रेक टू फिनीश आणि पाच ब्लॅक टू फिनीशची नोंद झालेली आहे. आंतरराष्ट्रीय कॅरम संघटनेचे अध्यक्ष जोसेफ मेयर, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्या हस्ते विजेत्यांना पदक व करंडक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सचिव वी. डी. नारायण, सरचिटणीस भारती नारायण, महेश सेकरी, यतीन ठाकूर उपस्थित होते.