सातारा – बोरखळ (ता.सातारा) येथील भैरवनाथ नवतरूण मंडळाने भरवलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये धावत्या बैलगाडीतून पडल्याने जाकी असलेल्या पुष्कर पवार या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी विनापरवाना बैलगाडा शर्यत भरवल्याप्रकरणी आयोजकांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोरखळ (ता. सातारा) येथील भैरवनाथ नवतरूण मंडळाने जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेल्या बोरखळ गावातील मुरदुंड नावाच्या शिवारात आज (दि.9) रोजी बैलगाडा शर्यत भरवली होती. या शर्यतीसाठी परिसरातून अनेक गाडी मालक हजर राहिले होते. शर्यती पाहण्यासाठी शौकिनांचीही मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान दुपारी शर्यतीला सुरूवात झाल्यानंतर पुष्कर हा त्याच्याकडील बैलगाडी पळवण्यासाठी फाटीवर बैलगाडीसह आला होता.
राऊंडमधील बैलगाड्यांची शर्यत सुरू झाल्यानंतर पुष्कर हा धावत्या बैलगाडीतून पडला. खाली पडल्यानंतर तो दुसऱ्या बैलगाडी अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ही शर्यत भरवण्यासाठी आयोजकांनी प्रशासनाकडून लागणारी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.