कराड – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी महेश दादाराव मांजरे (वय 30, रा. कार्वे नाका, कराड, मूळ रा. कवडगाव, माजलगाव, जि. बीड) यास कराडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व एक लाख 45 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबतव मिाहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी दिली.
याबाबत माहिती अशी, तू मला आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला, तर तुला मारून टाकीन. तुझ्या घरच्यांची वाट लावीन आणि स्वतःही जीव देईन, अशी धमकी महेश मांजरेने पीडित अल्पवयीन मुलीला जून 2015 मध्ये वारंवार दिली. त्याने पीडित मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. मार्च 2016 मध्ये जबरदस्तीने तिचे अर्धनग्न फोटो काढून ते इतरांना दाखविले. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिकारी पी. व्ही. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी व पीडिता यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकिलांचा युक्तिवाद व पोलिसांनी सादर केलेले पुरावे, यावरून गुन्हा सिद्ध झाल्याचा निकाल न्यायाधीश के. एस. होरे यांनी दिला. त्यांनी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व एक लाख 45 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडापैकी 25 हजार रुपये पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही त्यांनी दिला. या खटल्यात ऍड. शहा यांना ऍड. ऐश्वर्या यादव, ऍड. संध्या चव्हाण, ऍड. कोमल लाड, सहाय्यक पोलीस फौजदार ए. के. मदने, हवालदार जी. जी. माने यांनी सहकार्य केले.