सविंदणे (वार्ताहर)- मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे बैलगाडा शर्यत घाटातच वडिलोपार्जित जमिनी वाटपाच्या कारणावरून चुलता व चुलत भावाने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षे तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली. दरम्यान, घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संजय रखमा शिंदे (वय ३५, रा. शिंदवाडी, ता. शिरूर), असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. शिरूर पोलिसांत भानुदास शिंदे, ज्ञानोबा शिंदे (दोघे रा. शिंदेवाडी, मलठण) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गंगुबाई रखमा शिंदे (रा. रावडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय व त्याचे चुलते ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यामध्ये शिंदेवाडी येथील 14 एकर जमीन वाटपावरून वाद होता.
(दि.28) रोजी खंडोबा देवाची यात्रा होती. बैलगाडा घाटात शर्यत सुरू असताना वडीलोपार्जित जमीन वाटपाचे कारणावरून संतापलेल्या भानुदास शिंदे याने लाकडी दांड्याने चुलत भाऊ संजय यास मारहाण केली.
यावेळी चुलता ज्ञानोबा गोविंद शिंदे याने मारहाण करून पुतण्या संजय यास गंभीर जखमी केले. त्याला शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.