कराड -बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन मजुराचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून आणि छातीवर दगड घालून खून केला. ही घटना वाखाण परिसरात गुरुवारी (दि. 28) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी रवी रमेश कुडवे (वय 23, सध्या रा. वाखाण परिसर, मूळ रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) याला अटक केली आहे. नितीन नागेश भालशंकर (वय 21, रा. वाखाण परिसर, मूळ रा. वैराग) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाखाण परिसरातील बर्गे मळ्यातील हॉटेल वस्तीच्या पुढे पट्टी नावाच्या शिवारात सुजीत जाधव यांच्या मालकीच्या भाताच्या कापलेल्या मोकळ्या शेतात बार्शीहून आलेली मजूर कुटुंबे राहत आहेत. तेथेच नितीन भालशंकर हा कुटुंबासमवेत राहत होता. त्याचा मेव्हणा रवी कुडवे हादेखील त्याच परिसरात राहतो.
रवी कुडवेच्या बहिणीचा नितीन भालशंकरशी विवाह झाला होता. नितीन हा दारू पिऊन पत्नीला त्रास देत होता. त्यावरून रवी हा नितीनला समजावून सांगत असताना, दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान भांडणात झाले. रवीने हातांनी नितीनचा गळा दाबला.
त्यामुळे नितीन बेशुद्ध पडल्यावर रवीने त्याच्या छातीवर दगड मारून खून केला. त्यानंतर संशयित रवी कुडवे हा स्वतःहून कराड शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्याकडून घटनेची माहिती घेतली.
त्यानंतर पोलीस रवीला घेऊन घटनास्थळी गेले. तेथे पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी रवी कुडवेला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक चोरगे तपास करत आहेत.