पुणे- महापालिकेतील कामे मिळवून देतो, असे सांगून सत्ताधारी भाजप नगरसेवकाने एका ठेकेदाराकडून तीन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आणखी एक गुन्हा नगरसेवक घोगरे यांच्यावर दाखल झाला आहे.
मात्र, या अपहरण प्रकरणात महापौरांसह, भाजप नगरसेविकेच्या पतीचा थेट संबध असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच हे प्रकरण संघटीत गुन्हेगारीचे असून या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, घोगरे यांच्या विरोधात निखिल रत्नाकर दिवसे यांनी तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर दिवसे यांनी दत्तवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण केलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर या आरोपीने तुषार पाटील यांचे नाव घेतले. तर पाटील यांनी पोलिसांकडे महापौरांचे नाव घेतले असल्याचा दावा जगताप यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीवर गुन्हेगारीचे आरोप करणाऱ्या भाजप सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या प्रकरणी खुलासा करावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.
जगताप सांभाळून बोला… : महापौर मोहोळ
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जर राजकीय संस्कृती पाळली नाही, जर त्यांचा बोलण्याचा स्तर बदलला नाही, आपली भूमिका आणि वागणे बदलले नाही तर आम्हाला वैयक्तिक पातळीवर यावे लागेल; ते येऊ देऊ नका. नाहीतर या शहराची राजकीय संस्कृती बाजूला राहील आणि याची शिक्षा जगतापांना भोगावी लागेल, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका गटनेते गणेश बिडकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला. जो दोषी असतील त्याला पोलीस पाहून घेतील, तुम्ही कोणाचे ठेके घेतले नाहीत. आपण दुसऱ्याच्या घरावर दगड मारतो तेव्हा आपले घर काचेचे आहे, हे लक्षात ठेवा.