पुणे – महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाचा लेखी आदेश अथवा इतर कोणतीही माहितीची स्पष्टता असलेला निर्णय अद्याप जाहीर न झाल्याने पुण्यात नेमके किती नगरसेवक वाढणार याबाबत दोन दिवसानंतरही संभ्रमाची स्थिती कायम आहे. त्यातच, शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या बाबतची स्पष्टता आता पुढील आठवड्यातच स्पष्ट होणार आहे.
राज्याच्या बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी 17 टक्के सदस्य संख्या वाढ करण्यचा निर्णय घेतला आहे. या निवडणूकांसाठी 2011 ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे तसेच 2021 ची लोकसंख्या जाहीर झालेली नसली 2011 च्या लोकसंख्येत वाढ झालेली असल्याने या वाढलेल्या लोकसंख्येला योग्य प्रतिनिधीत्व मिळाले यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच कमीत कमी 168 तर जास्तीत जास्त 185 नगरसेवक असतील असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे 17 टक्के वाढ गृहीत धरल्यास महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढून आता जास्तीतजास्त 185 होणार आहे. मात्र, त्याचवेळी शासनाचा आदेश सदस्य वाढीसाठी नसून लोकसंख्या वाढीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेची सदस्य संख्या 11 ने वाढून 173 होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने केलेली ही वाढ लोकसंख्येवर गृहीत धरल्याने सध्याच्या 35 लाख 50 हजार लोकसंख्येचा विचार करता एमआरटीपी ऍक्टमधील तरतूदीनुसार नव्या नियमाने 30 लाखांच्या लोकसंख्येसाठी 168 नगरसेवक तर त्या पुढील प्रत्येक लाखासाठी 1 नगरसेवक असे 5 नगरसेवक वाढत असल्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे आदेशानंतरच हा संभ्रम दूर होणार असला तरी अद्याप शासनाचा आदेशाही आलेला नसल्याने संभ्रमाची स्थिती कायम आहे.