मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा शनिवारी झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. यानंतर आता आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
धुळे दौऱ्यावर असणाऱ्या गिरीश महाजन यांनी “आम्हाला तुमच्या दाखल्याची गरज नाही. देशभरात जनता भाजपा आणि पंतप्रधान मोदींना सर्टिफिकेट देते. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? तुमची कुवत आहे का? तुम्ही गटारातले बेडूक आहात. समुद्रामध्ये काय चालले आहे ते बघा. आज संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाकडे पाहात आहे,” असे गिरीश महाजन म्हणाले.
“उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. ते सत्ता लंपट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पाया पडा, नमाज पढा किंवा फुलं वाहा उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाही. भोंग्यांच्या प्रश्नावर ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर देखील एक शब्द देखील बोलायला ते तयार नाही. यामुळे त्यांच हिंदुत्व किती बेगडी आहे हे सर्वांच्या लक्षात आल आहे,” असेही गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान, काल झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा देखील समाचार घेतला.