- पिंपरी-चिंचवड नावाच्या समावेशला “खो’च
पिंपरी – मेट्रोच्या कामाची प्रगती आणि खर्च करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका सरस ठरत असताना मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवड शहराच्या नावाला स्थान मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. खराळवाडीत मेट्रोच्या सीमभींतीवर उभारलेल्या स्टीलच्या बॅरिकेड्सचे पुणे मेट्रो असे ठसठशीत अक्षरे महापालिकेला व पिंपरी-चिंचवडकरांना वाकुल्या दाखवत आहेत. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाला नावाच्या समावेशाबाबत ठेंगा दाखवित आपला मनमानी कारभार सुरुच ठेवला आहे.
पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम मोठ्या वेगाने सुरु असून, पुणे जिल्ह्यात सर्वांत आधी मेट्रो पिंपरी-चिंचवड शहरातच धावण्याची शक्यता आहे. मेट्रोची प्रात्यक्षिकेही पिंपरी-चिंचवडमध्येच झाली. त्याकरिता महापालिका प्रशासनाकडून निधीची कमतरता भासू दिलेली जात नाही. इतर शहरांप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी मेट्रोच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ दिला नाही. मेट्रोने मनात येईल तेव्हा शहरातील मुख्य रस्ता अडवला, गेल्या तीन वर्षांपासून नागरिक वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करत आहेत, परंतु कधीही पिंपरी-चिंचवडकरांनी तक्रार केली नाही. पिंपरी-चिंचवडकरांची एक माफक अपेक्षा होती की मेट्रोला आमच्या शहराचेही नाव मिळावे, परंतु मेट्रोने पिंपरी-चिंचवडमध्ये “पुणे मेट्रो’चे फलक लावून शहरवासियांना वाकुल्या दाखविल्या आहेत.
समजुतीसाठी आश्वासने
सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी दोन्ही शहरांमधील हा संयुक्त प्रकल्प असल्याने मेट्रोच्या नावात केवळ पुण्याचा नको तर पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश असावा, याकरिता लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. मेट्रोच्या ट्रॅकचे काम काही प्रमाणात पूर्ण झाल्यानंतर ट्रायलसाठी ट्रायलसाठी मेट्रोचे कोच खराळवाडीत दाखल झालेल्या कोचवर केवळ पुणे मेट्रोचे नाव होते. या प्रकाराने महापालिका पदाधिकारी चांगलेच संतापले. त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकल्पाच्या नावात पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले. मात्र, हे आश्वासन केवळ समजूत काढण्यासाठीच होते, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यावेळी मेट्रोच वरिष्ठ अधिकारी सांगत होते की संपूर्ण महाराष्ट्रात “महा मेट्रो’ या एकाच नावाने मेट्रो धावणार आहे. परंतु सगळीकडे पुणे मेट्रोचे फलक लावून शहरातील पदाधिकारी आणि नागरिकांना मेट्रोने एक प्रकारे ठेंगाच दाखविला आहे.
पदाधिकारी निवांत
मेट्रोच्या संरक्षक कठड्यावरील बॅरीकेडस्वर पुणे मेट्रो आणि महामेट्रो अशी अक्षरे मोठ्या दिमाखात सहा महिन्यांपासून झळकत आहेत. विशेष म्हणजे याकडे महापालिकेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचे अद्यापही लक्ष गेलेले नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पिंपरी-चिंचवड शहराचे स्वत:चे भौगोलिक स्थान व जगभरातील महत्व आबाधित आहे. मात्र, मेट्रोच्या कामात शहराच्या नावाचा उल्लेख टाळण्याचे कारस्थान मेट्रो प्रशासनाकडून अगदी पद्धतशीरपणे केले जात आहे.
अशी अनेक उदाहरणे
मेट्रो प्रशासनाला शहराच्या स्वाभिमानाचे सोयरं सूतक नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी तत्कालीन स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना महापालिका मुख्यालयासमोरच मेट्रोच्या बाऊन्सरकडून धमकाविण्यात आले होते. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, मेट्रो प्रशासनाला जाग आली. त्यानंतर या बाऊन्सरची स्थायी सभापतींच्या दालनात ओळख परेड करुन, या प्रकरणावर पडदा टाकला.
विसरले की फसवले ?
मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करण्याची महापालिका पदाधिकाऱ्यांची जुनी मागणी आहे. महापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त यांच्या मागणीचा विचार करण्याचे मेट्रो प्रशासनाकडून दिलेले आश्वासन पाळले जात नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. मेट्रो नावाचा मुद्दा विसरते आहे की शहरवासियांना आणि पदाधिकाऱ्यांना फसवते आहे? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.