लाखणगाव -बीट पिकाचे बाजारभाव वाढल्याने आंबेगाव तालुक्यातील बीट उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी खरेदी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिट पिकाचे उत्पादन घेतले जाते. मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने बीट पीक पाण्याखाली जाऊन खराब झाले आहे. त्यामुळे उत्पादनही घटले असल्याने बाजारपेठेत आवक कमी होत आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाल्याने बिटची मागणी वाढली आहे.
मागणी जास्त आणि उत्पादन कमी यामुळे बीट पिकाचे बाजारभाव 500 ते 600 रुपये दहा किलो झाले आहेत. एका पिशवीचे वजन 50 ते 60 किलो दरम्यान भरत असल्याने अडीच ते तीन हजार रुपये प्रति पिशवीप्रमाणे शेतकऱ्यांना मिळत असल्याने बीट उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चांडोली, पिंपळगाव, निरगुडसर, जवळे, भराडी, पारगाव, काठापूर आदी गावांमध्ये बिटचे उत्पादन घेतले जाते, अशी माहिती देवगांवचे प्रगतशील शेतकरी बाबाजी गावडे यांनी दिली.
ते म्हणाले की, 15 दिवसांपूर्वी बीट पिकाला 20 ते 30 रुपये बाजारभाव मिळत होता; परंतु पावसामुळे बीट पिक सडल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला आहे.