मंचर -श्रीक्षेत्र भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथे भरणारी श्रावण महिन्याची यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाली आहे. सध्या मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येथे येऊ नये, येथे येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी (दि. 8) दिला आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर यात्रा बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर मंचर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, खेड निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले तेव्हापासून श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे.
श्रावण महिना मंगळवार दि.21 पासून सुुरू होणार आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांनी येथे येवू नये. गजानन टोम्पे म्हणाले की, डिंभे आणि पालखेवाडी येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे.जर कोणी या भागात फिरताना आढळल्यास गाडी जप्त करुन संबधितावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.