संगमनेर (प्रतिनिधी) : बुधवारी शहर व तालुका ग्रामीण भागासह दिवसभरात तब्बल 15 रूग्ण संख्या वाढल्याने चिंतेत वाढ होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या भावना बोलून व्यक्त केल्या. सकाळी चार आणि संध्याकाळी अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 180 वर जाऊन पोहचली असून तालुक्यातील रुग्णांची संख्या आता द्विशतकाकडे जात असल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान श्रमिक नगरचा एका 57 वर्षीय कोरोना बधितचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ऑरेंज कॉर्नर परिसरातील कुंथुनाथ सोसायटीच्या 59 वर्षीय इसमा सह 73 वर्षीय वयोवृद्ध महिला, गणेश नगर परिसरातील 65 वर्षीय व्यावसायिक, व निमगाव जाळी येथील 28 वर्षीय तरुणाला कोरोनाचे संक्रमण झाल्याचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला होता.
संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार हिवरगाव पठार येथून एक, पेमगिरी येथून एक, पिंपळगाव कोंझिरा येथून तीन, खांडगाव परिसरातून दोन, ढोलेवाडी येथून एक, गुंजाळवाडी परिसरातून दोन तर संगमनेर शहरातील रेहमत नगर येथून एक असे एकूण 11 रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील बधितांची संख्या 180 वर जाऊन पोहचली आहे.