पिंपरी -हेल्मेट वापरा, सीटबेल्ट वापरा, विरुद्ध दिशेने वाहने चालवू नका, वेगावर नियंत्रण ठेवा असे सल्ले देत खुद्द यमराजाने पिंपरी-चिंचवड मधील वाहन चालकांना तिळगूळ वाटले. स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या पिंपरी, चिंचवड आणि निगडी वाहतूक विभागातर्फे 34 वा वाहतूक सुरक्षा सप्ताह आणि मकर संक्रांती निमित्त शहरातील मुख्य चौकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यमराजाची वेशभूषा परिधान केलेल्या कार्यकर्त्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
यावेळी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक विजया कारंडे, पिंपरी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, नंदू पत्की, निरजा देशपांडे, कांचन राजकर, वाहतूक पोलीस उपस्थित होते.
शहरात दररोज शेकडो वाहन चालकांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत दंडात्मक कारवाई केली जाते. काही वाहन चालक थेट वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून कारवाईचा विरोधात करतात. नियमांचे पालन न केल्याने वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
शिवाय बेशिस्त वाहतूक असेल तर पादचारी नागरिकांना देखील जीव मुठीत घेऊन चालावे लागते. वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. विविध संघटनांसह वाहतूक विभाग देखील यासाठी पुढाकार घेतात.
हेल्मेटचा वापर करा, सिग्नलचे नियम पाळा, विरुद्ध दिशेने वाहने चालवू नका अशा सूचना करत वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण, असा सल्ला स्वतः यमराजाने दिला. 34 वा वाहतूक सुरक्षा सप्ताह आणि मकर संक्रांती निमित्त हा उपक्रम घेण्यात आला. ज्या वाहन चालकांनी हेल्मेट घातलेले नाही, अशा वाहन चालकांना तिळगुळाचे हेल्मेट घालून त्यांचा उपरोधित सत्कार करण्यात आला. ज्या वाहन चालकांनी नियमांचे पालन केले आहे, अशांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहन चालकांनी नियमांबाबत सजग व्हावे यासाठी वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. नियमभंग करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
– प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक चिंचवड वाहतूक विभाग