हडपसर (विवेकानंद काटमोरे) – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे खासगी ट्रॅव्हल बस अनाधिकृत पणे उभ्या केल्या जातात.त्यामुळे इतर वाहनचालकांना तसेच नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.हडपसर वाहतूक शाखेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. दरम्यान, याविषयी आमदार चेतन तुपे पाटील यांनी थेट विधानसभेत आवाज उठविला आणि मतदार संघात आल्यानंतर त्यांनी पोलीसांनी कामात कसूर केल्यास हक्कभंग आणण्याचा इशाराही दिला. यानंतर हडपसर वाहतूक पोलिसांनी येथील खासगी ट्रॅव्हल बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने सध्या रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या विळख्यात असणारा रस्ता मोकळा मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे.
हडपसर उपनगरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर मगरपट्टा चौक ते पंधरा नंबर चौक दरम्यान खासगी ट्रॅव्हल बसचे ठिकठिकाणी अनाधिकृत थांबे आहेत. रस्त्यावर समांतर तीन-तीन ट्रॅव्हल बस तासनतास पार्किंग केल्या जातात.त्यामुळे हडपसर मधील या मुख्य रस्त्याचा श्वास रोखला गेला असून रस्त्यावरील खासगी बसेचे अनाधिकृत थांबे हटवा अशी मागणी केली जात होती. ट्रॅव्हल बसेने संपूर्ण रस्त्याचा ताबाच घेऊन वाहतूक कोंडी केली होती. सोसायटी धारकांना किंवा इतर वाहनचालकांना रस्ताही दिला जात नव्हता. या कारणांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. आमदार चेतन तुपे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतरही अपेक्षित बदल होत नसल्याचे दिसून आल्यानंतर पुन्हा एकदा आमदार तुपे यांनी थेट कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक पोलिसांनवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता.या इशाऱ्या अखेर हडपसर वाहतूक पोलिसांनी या खासगी ट्रॅव्हल बसेसवर नियमित कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मुख्यरस्त्याने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे.
येथे आहेत खासगी ट्रॅव्हल बसचे अनाधिकृत थांबे
मगरपट्टा चौकाच्या पुढे सावली कॉर्नर , हडपसर गाडीतळ पीएमपीच्या डेपोच्या बाजूला, हॉटेल प्रणामच्या समोर,रविदर्शन सोसायटी, आकाशवाणी प्रवेशद्वार, जेम्स बजाज शोरूम ,पंधरा नंबर चौक आणि मत्स्यबीज केंद्र याठिकाणी रात्री आठ ते मध्यरात्री पर्यंत खासगी बसेस रस्त्यावर मनमानी पध्दतीने उभ्या केल्या जात होत्या.
कारवाईत सातत्य का नाही?
आमदार चेतन तुपे यांनी या विषयावर लक्ष वेधले तेव्हा पोलिसांनी कारवाईला सुरवात केली हे चांगलेच झाले आहे ,असा शब्दात काही ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला अभय देण्याचे काय कारण आहे.अनाधिकृत थांबे असल्याने नियमितपणे कारवाई करावी. आता काहीशा बदल दिसत आहे. अशीच कारवाई सातत्याने करून येथील वाहतूक कोंडी आणि अपघात परस्थिती कमी करावी अशी अपेक्षाही परिसरातील सोसायटी धारकांनी व्यक्त केली आहे.
वाहनचालक व नागरिकांना वेठीस धरू नका
हडपसरच्या मुख्य रस्त्यावर अनाधिकृतपणे खासगी ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहनचालकांना व नागरिकांना वेठीस धरले जात होते.आर्थिक हितसंबंध असल्यानेच की काय वाहतूक पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आपण हा विषय अधिवेशनात सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला होता.त्याचबरोबर कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक पोलिसांनवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. आता कुठे थोडाफार बदल दिसत आहे. परंतु, पूर्णपणे येथील अनाधिकृत ट्रॅव्हल बसेस थांबे पोलिसांनी बंद करून नागरिकांना वाहतूक कोंडी विरहित रस्ता देणे गरजेचे आहे.
– चेतन तुपे पाटील,आमदार, हडपसर विधानसभा.