मुंबई – देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात सलग दुसऱ्यादिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली असून बाधितांची २ लाख ३६ हजार ६५७ वर पोहोचली आहे. यासह महाराष्ट्रातही करोनाबाधित रुग्णसंख्या ८० हजारावर पोहचली आहे. राज्यात अशीच स्थिती राहिल्यास महाराष्ट्र बाधितांमध्ये चीनलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. दरम्यान, चीनमध्ये सध्या करोनाचे ८४ हजार रुग्ण आहेत.
राज्यात शुक्रवारी करोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीचा क्रमांक असून या राज्यांनाही मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.