सांगली – लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील जनतेनं हाती घेतली आहे, जनतेला देशातील संविधान वाचवायचे असून जनता भाजपच्या विरोधात काम करत असल्याची खोचक टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासली असल्याचे ते म्हणाले.
जयंत पाटील यांनी सांगितले की, जीएसटीची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जाते. आंतरराष्ट्रीय किमती कमी असताना गॅस पेट्रोल डिझेल महाग झाले आहेत. त्यामुळे जनता भाजपच्या विरोधात काम करत असून 32 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.
अजित पवार गटाच्या आमदारांवरही भाष्य करताना ते म्हणाले, आता पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे नवीन चेहरे पुढे आले असून तरुण मंडळी चांगले काम करत आहे. ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल. तरुणांना संधी देण्यासाठी शरद पवार हे नेहमीच आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर, नाशिक, जळगाव पुणे सह सर्वच कांदा उत्पादक क्षेत्रात कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मागील सहा महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काही, तरी आश्वासन देतील त्याला अर्थ नाही.
पूर्ण वेळ निघून गेली असून लाल कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झालं आहे. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी आश्वासने दिली. मात्र, खर्च दुप्पट झाल्याची टीका त्यांनी केली.