Pawan Singh – भोजपुरी स्टार पवन सिंह याने अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने बिहारमधील काराकाट लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. आता पवनच्या आईनेही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आईने अर्ज दाखल केल्याने पवन निवडणुकीतून माघार घेणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भाजपने काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून पवनची उमेदवारी जाहीर केली. मात्र, पवनने ती उमेदवारी नाकारली. त्यानंतर भाजपचा सदस्य असणाऱ्या पवनने काराकाटमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या मतदारसंघातून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह निवडणूक लढवत आहेत.
एनडीएच्या उमेदवाराविरोधात निवडणूक न लढवण्याचा सल्ला पवन याला भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे समजते. माघार घेतली नाही तर पवनवर भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळू लागले. अशात पवनच्या आई प्रतिमा देवी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पवन उमेदवारी अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता आता बळावली आहे.