राहुल आवारेला ब्रॉंझपदकाची संधी
नूर-सुलतान (कझाकिस्तान): भारताच्या दीपक पुनियाने 86 किलो गटात अंतिम फेरीत स्थान मिळवित जागतिक कुस्ती स्पर्धेतील विजेतेपदाच्या आशा पल्लवित केल्या. त्याआधी त्याने उपांत्य फेरी गाठतानाच ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला होता. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. 61 किलो या बिगर ऑलिम्पिक गटात त्याला ब्रॉंझपदकासाठी झुंजावे लागणार आहे.
कनिष्ठ गटाचा जागतिक विजेता खेळाडू पुनियाने पहिल्या फेरीत स्थानिक खेळाडू अदिलेत दावलुम्बायेव याला उत्कंठापूर्ण लढतीनंतर पराभूत केले. ही लढत पुनियाने 0-2 अशा पिछाडीवरून 7-7 अशी बरोबरीत आणली. मात्र पुनियाला तांत्रिक गुणांच्या आधारे विजयी घोषित करण्यात आले. या निर्णयाविरूद्ध दावलुम्बायेवने आक्षेप घेतला होता. तथापि पंचांनी पुनियाच्याच बाजूने निकाल दिला. पुनियाने नंतरच्या लढतीत ताजिकिस्तानच्या बाखदोर कोदिरोव याचा 6-0 असा धुव्वा उडविला. उपांत्यपूर्व फेरीत त्याला कोलंबियाच्या कार्लोस अर्तोरो मेंदेझविरूद्ध 7-6 असा विजय मिळविताना झगडावे लागले.
आत्मविश्वास उंचावलेल्या पुनियाने उपांत्य लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टीफन र्रीचमुथ याचा 8-2 असा दणदणीत पराभव केला. अंतिम फेरीत त्याला इराणच्या हसन येझदानीच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करणारा पुनिया हा भारताचा चौथा खेळाडू आहे. याआधी बजरंग पुनिया व रवी दहिया यांनी पुरूष गटात तर विनेश फोगटने महिलांमध्ये ब्रॉंझपदक मिळवित ऑलिम्पिकमधील सहभाग निश्चित केला आहे.
आवारे याने उपउपांत्यपूर्व फेरीत तुर्कमेनिस्तानच्या करीम होजकावोक याच्यावर तांत्रिक गुणांच्या आधारे विजय मिळविला. उपांत्यपूर्व फेरीत त्याला कझाकिस्तानच्या रसूल कालियेवविरूद्ध संघर्ष करावा लागला. 0-2 अशा पिछाडीवरून त्याने 2-2 अशी बरोबरी केली. त्यानंतर त्याने आक्रमक खेळ करीत आघाडी वाढविली आणि 10-7 असा विजय मिळविला. उपांत्य फेरीत मात्र आवारेला अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. जॉर्जियाच्या बेको लोमटेडेझ याने त्याचा 10-6 असा सहज पराभव केला. पहिल्या टप्प्यातच आवारे 1-7 असा पिछाडीवर होता. ही पिछाडी भरून काढण्यात त्याला अपयश आले.
भारताच्या जितेंदर याला 79 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीतच पराभवास सामोरे जावे लागले. त्याने पहिल्या कुस्तीत मोलोदोवाच्या घिओर्घी याच्यावर 7-2 असा सफाईदार विजय मिळविला. पाठोपाठ त्याने टर्कीच्या मुहाम्मेत नुरी कोटानोग्लु याला 7-2 असे पराभूत केले. मात्र नंतरच्या फेरीत त्याला स्लोवेनियाच्या तैमुराझ साल्कोझानोव्ह याने 4-0 असे नमविले. 97 किलो गटात मोसम खत्री हा पहिल्याच फेरीत पराभूत झाला. त्याला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या काईल फ्रेड्रिक स्निडरने तांत्रिक गुणांच्या आधारे हरविले.