नगर -महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षापूर्वी नगर शहरातील विविध विकासकामांसाठी मंजूर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या विशेष निधीतील प्रभाग सात मधील मंजूर असलेली कामे रखडली असून, ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी या प्रभागातील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
या बाबत नगरसेवक अशोक बडे, दत्तात्रय सप्रे, भालचंद्र भाकरे, अनिल फुंदे आदींच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी मंजूर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक सात मधील रस्ते, ड्रेनेजलाईन आदी कामे मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये अक्षय कॉलनी, सौरभ कॉलनी तसेच नागापूर मधील पवार घर ते मुंजोबा चौक, दारकुंडे घर ते थोरात रॉकेल दुकानापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे कामाचा समावेश होता. मात्र, हे काम अद्यापही सुरू झालेले नाही.
या कामाचे कार्यरंभ आदेश कोणत्या ठेकेदाराला दिले आहेत व ते काम कधी सुरू होणार याबाबत माहिती द्यावी. तसेच रखडलेले काम तातडीने सुरू करण्याबाबत ठेकेदाराला आदेश द्यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.