लोणी काळभोर – पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणारा व हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमध्ये काम करणारा एक 23 वर्षीय कामगार करोनाबाधित असल्याचे गुरुवारी (दि. 11) आढळले आहे.
बाधित तरुणाला हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून, या तिघांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागील दोन महिन्याच्या कालावधीत करोनाचे सात रुग्ण आढळून आले होते. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर उर्वरित उपचार घेऊन घरी परतले आहेत. मागील आठवडाभरापासून करोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत करोना फ्री झाली होती.
उरुळी कांचन येथील तरूण बाधित
सोरतापवाडी-उरुळी कांचन हद्दीतील एका तरुणाला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली. त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्या संपर्कातील चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून, त्यांना होम क्वारंटाइन केले आहे.