मुंबई – लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) आपल्या सर्व कामांना पुन्हा सुरुवात केली आहे. त्यात सर्व ठिकाणची कार्यालये उघडण्याबरोबरच जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करणे, संमती शिबिरे घेणे आणि युटिलिटी स्थलांतरित करणे या कामांचा समावेश आहे.
एनएचएसआरसीएलतर्फे तीन सक्रिय टेंडर्ससाठी प्रथमच ऑनलाइन प्री-बिड बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. आपल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती परस्परांना देण्यासाठी एनएचएसआरसीएलच्या सर्व विभागांचे प्रमुख टाळेबंदीच्या कालावधीत नियमितपणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेटत होते. टाळेबंदीच्या काळात एनएचएसआरसीएलच्या कामांत खंड पडला नव्हता.
टाळेबंदीत लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध आता हळूहळू मागे घेतले जात असताना एनएचएसआरसीएलची नित्यकर्मेही सुरू होऊ लागली आहेत; परंतु अंतरसोवळे (सोशल डिस्टन्सिंग) आणि उच्च दर्जाची स्वच्छता यामध्ये वाढ करण्यात आली आहे.