सायनाने आत्मपरीक्षण करावे – गोपीचंद

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये स्वतःचा ठसा उमटवला असला तरीही गेल्या काही स्पर्धांत आलेले अपयश चिंताजनक आहे, त्यामुळे सायना नेहवालने आपल्या खेळाचे तसेच दृष्टिकोनाचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी दिला आहे.

सायनाने जेव्हा बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मी तिचा खेळ पाहात आहे. तिच्या प्रगतीचा आलेख खरेच अविश्‍वसनीय आहे. तिची जिद्द व समोर आलेल्या संकटावर मात करण्याची वृत्ती कौतुकास्पद आहे. सुरुवातीला तिने माझ्या अकादमीत सराव केला. मात्र, त्यानंतर तिने अकादमी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिने हा निर्णय बदलावा यासाठी मी तिच्याशी सातत्याने संवाद केला. आजही मला तिने असे का केले याचे उत्तर मिळालेले नाही. अर्थात, आता यावर बोलण्यात अर्थ नाही. ती एक अत्यंत गुणवान खेळाडू आहे. जागतिक बॅडमिंटनवर असलेले चीन, कोरिया, इंडोनेशिया व तैवान यांचे वर्चस्व मोडून काढण्याचा पराक्रम केला. तिच्याकडूनच प्रेरण घेत आज पी. व्ही. सिंधू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा प्रस्थापित करताना दिसते, अशा शब्दांत गोपीचंद यांनी आपले मत मांडले.

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांनी क्रिकेट तळागाळापर्यंत पोहोचवले किंवा सानिया मिर्झाने टेनिसची व्याप्ती वाढवली तेच काम सायनाने बॅडमिंटनसाठी केले हे कोणीच नाकारणार नाही. पण गेल्या दोन मोसमातील तिची कामगिरी तिच्या कारकिर्दीसाठी चांगली नाही. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये तिने जे वर्चस्व राखणे अपेक्षित आहे तिथेच तिला अपयश येत आहे. तिच्या खेळात मूलभूत चुका नाहीत पण मोठ्या सामन्यांमध्ये जो आत्मविश्‍वास दिसणे आवश्‍यक आहे तो दिसत नाही. सध्या करोनाच्या संकटामुळे सर्व क्रीडापटूंना आपापल्या घरातच राहावे लागत आहे. हा काळ खडतर असला तरीही खेळाडूंसाठी तसेच त्यांना मिळत असलेल्या विश्रांतीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तसेच सायनाला जर आगामी काळात पुन्हा एकदा यशाचा आलेख उंचवायचा असेल तर तिने आपल्या खेळाचे रेकॉर्डिंग पाहून कुठे चुका होत आहेत याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. प्रत्येक वेळी प्रशिक्षकच चुका दाखवेल किंवा सल्ला देईल अशी अपेक्षा करू नये, उलट स्वतःच सराव करताना कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा केली पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे, असेही गोपीचंद यांनी सांगितले.

सायना व सिंधूकडे अफाट गुणवत्ता….

सायनाने जरी माझी अकादमी सोडली असली व सिंधू माझ्याच अकादमीत सराव करत असली तरीही मी या दोघींमध्ये कधीच फरक केला नाही. या दोघी मला माझ्या मुलींइतक्‍याच प्रिय आहेत. त्यांच्यापैकी एकीची निवड करणे शक्‍यच नाही. या दोघींकडे अफाट गुणवत्ता आहे व येत्या काळात त्यांनी देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून द्यावे, अशी अपेक्षाही गोपीचंद यांनी व्यक्‍त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.