पिंपरी – जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, शिधा पत्रिका कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.15) सुरूच होता. कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महापालिकेतील सर्व दालने बंद होती. त्यामुळे महापालिकेसह शहरातील इतर शासकीय कार्यालय परिसरात शुकशुकाट होता. संपामुळे कामकाज ठप्प होते. तर जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होण्याचे कुठलेही प्रयोजन नाही. त्यामुळे हे अधिकारी, कर्मचारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहतील, अशा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्त पदे भरावीत अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने बुधवारीही बेमुदत संप सुरू होता.
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. काम नाही, वेतन नाही हे धोरण अनुसरण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी दिल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम राहिले.
बुधवारीही कर्मचारी महापालिकेकडे फिरकले नाहीत. जे कर्मचारी आले होते. त्यांना घरी जायला सांगितले. अधिकारी आले तरी दालन उघडले जात नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांना आल्या पाऊली परत फिरावे लागत आहे. दुसऱ्या दिवशीही संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका, क्षेत्रीय कार्यालये बंद आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयातील 12 कर्मचारी संपावर
शहरात 6 दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या सहाही कार्यालयात मिळून फक्त 12 कर्मचारी संपावर गेल्याची माहिती सब दुय्यम निबंधक ए. डी. लाडे यांनी दिली. त्यामुळे काही प्रमाणात कामकाजावर परिणाम झाला.
उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाजही विस्कळीत
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी मिळून 85 जणांचा स्टाफ आहे. यामधील 53 अधिकारी, कर्मचारी हजर असून 5 रजवेर आहेत. तर 27 कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयातही काही प्रमाणात कामकाज विस्कळीत झाले होते. मात्र, उपलब्ध असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरूच असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी सांगितले.
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच ः महापालिकेत शुकशुकाट, काही विभागांना टाळे
शिधा पत्रिका कार्यालयात सर्वच कर्मचारी संपावर
शहरातील अ आणि ज शिधा पत्रिका कार्यालयात फक्त 7 अधिकारी, कर्मचारी सेवेत आहेत. यामध्ये अन्नपुरवठा अधिकारी दिनेश तावरेच फक्त कार्यालयात हजर होते. उर्वरित कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागत होते. तर जेवढे शक्य होत आहे, त्यानुसार नागरिकांची कामे केली जात असल्याचे तावरे यांनी सांगितले.